
सामना प्रतिनिधी । नगर
नेप्ती (ता. नगर) येथील नेप्ती माध्यमिक विद्यालयावर तातडीने प्रशासक नेमून शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, प्रवास भत्ता आदि भ्रष्टाचाराची चौकशी करावी, तसेच मुख्याध्यापक व क्लार्कची बदली करण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी गुरुवार दि. 25 जुलै रोजी सकाळी जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप थोरे यांच्या दालनासह शेजारील कार्यालयास टाळे ठोकले. तर शिक्षणाधिकार्यांच्या दालनाबाहेर ग्रामस्थांनी ठिय्या मांडून, ठोस आश्वासन मिळेपर्यंन्त आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतला. शिक्षणाधिकारी थोरे यांनी आंदोलकांशी चर्चा करुन लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
नेप्ती माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षण संस्थेत वारंवार बदल करण्यात येत असून, शाळेत विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सोयीसुविधा नाही. प्रयोग शाळा, खिडक्यांना झडप व पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संस्थेचे 18 चेंज रिपोर्ट धर्मादायआयुक्त कार्यालयात दाखल करण्यात आले असून, अद्यापि मान्यताप्राप्त शिक्षण संस्था या शाळेसाठी असतित्वात नाही. विद्यार्थ्यांचे बनावट सह्या करुन शिष्यवृत्तीमध्ये तसेच शालेय पोषण आहारात अपहार करुन आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने गावाच्या ग्रामसभेत शाळेवर प्रशासक नेमण्याचा ठराव घेण्यात आला होता. मात्र माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी शिक्षणाधिकारी यांच्या दालनाला टाळे ठोकून आंदोलन केले.
ग्रामसभेच्या अधिकारानुसार शाळेवर प्रशासक नेमून तातडीने कारवाई व्हावी. संस्थेशी वाद नसून, मुख्याध्यापक व क्लार्कच्या मनमानी कारभाराला ग्रामस्थांचा विरोध आहे. गावात ज्ञानदानाचे कार्य चांगले चालून विद्यार्थी शिकले पाहिजेत. मात्र शालेच्या भ्रष्टाचार व चुकीच्या कामामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले असल्याचे माजी जि.प. सदस्य अरुण होळकर यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी थोरे यांनी आंदोलकांशी चर्चा करुन कार्यालयाच्या स्तरावर शिष्यवृत्ती, रजा प्रवास सवलत, शालेय पोषण आहार या संदर्भात 15 दिवसात चौकशी करुन चौकशी अहवालाप्रमाणे कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तर ग्रामस्थांनी देखील 15 दिवसानंतर ठोस कार्यवाही न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनात माजी जि.प. सदस्य अरुण होळकर, सरपंच सुधाकर कदम, मा. सरपंच विठ्ठल जपकर, उपसरपंच शिवाजी होळकर, अतुल गवारे, राहूल गवारे, रामदास फुले, गोरख जपकर, बाबासाहेब पवार, सुभाष जपकर, जालिंदर शिंदे, अमोल चौघुले, राजेंद्र होळकर, रघुनाथ होळकर, शिवाजी जपकर, बाळासाहेब होळकर, प्रकाश कांडेकर, सुरेश कदम, गोरख फुले, पंढरीनाथ जपकर, बाळासाहेब जपकर, विकास वाघ, बबन गडाख, अरुण बेल्हेकर, संदिप होले, दत्तात्रय जपकर, हरीभाऊ जपकर, हौशीराम जपकर, भास्कर जपकर, सत्तार सय्यद, बबन कांडेकर, अशोक वाघ, विजय घोरपडे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.



























































