
कोकणातील रत्नागिरीच्या बारसूमध्ये स्थानिकांचा विरोध डावलून रिफायनरीचा प्रकल्प राबवण्यासाठी राज्यातील मिंधे-फडणवीस सरकारची धडपड सुरू आहे. ग्रामस्थांचा विरोध असताना, त्यांचं आंदोलन पोलिसांच्या बळावर दपडण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी बारसू येथील ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. तसंच या प्रकल्पाचं खापर पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फोडू पाहणाऱ्या विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक देखील उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या भागातून होणारा विरोध चिरडून टाकण्यासाठी सरकारकडून मोठ्याप्रमाणावर पोलीस बळाचा वापर केला जात आहे. मराठी आणि कोकणी माणसांचा, भूमिपुत्रांचा आवज दाबण्यासाठी पोलिसांची छावणी मी पाहिली. महाराष्ट्रभरातून पोलीस इकडे बोलवण्याता आली आहे. एसपी देखील इकडे तळ ठोकून बसले आहेत. हे नक्की कोणासाठी सुरू आहे?, असा सवाल विनायक राऊत यांनी यावेळी केला. इथली जनता या देशाची नागरिक, भूमीपुत्र नाही का?’, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
‘सातत्यानं आपल्या भूमीच्या रक्षणासाठी आंदोलनात उतरणाऱ्या ग्रामस्थांचा पोलिसांच्या बळावर आवाज दाबून टाकण्यात येत आहे. त्यांच्यात भितीचं वातावरण निर्माण करायचं आणि कोणत्याही परिस्थितीत रिफायनरीचा गाडा रेटून न्यायचा अशा पद्धतीची दमनशाही शिंदे सरकारच्या कारभारामध्ये गृहमंत्री फडणवीस यांच्या पोलिसांनी आणि उद्योगमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या खात्यामार्फत सुरू झाली आहे’, असा गंभीर आरोप राऊत यांनी यावेळी केला. अशा प्रकारची दमनशाही यापूर्वी आम्ही कधीही पाहिली नव्हती. प्रथमच सशस्त्र पोलीसफाटा येथे तैनात केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचंही ते म्हणाले.
तसंच ‘रिफायनरीला विरोध होत असताना विरोधकांच्या संघटनांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना पत्र देऊन आमचं म्हणणं ऐकून घ्या अशी विनंती वारंवार केली आहे. परंतु या तिघांनी त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आणि आज पोलिसी फौजफाट्यामध्ये त्यांच्यावर मात्र ज्या दंडुकेशाहीने त्यांच्यावर जरब बसवण्याचा प्रयत्न केला जातो आहे’, तो निषेधार्ह असल्याचंही ते म्हणाले.
उदय सामंत यांना निरुद्योगमंत्री म्हणत विनायक राऊत यांनी त्यांना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना हा प्रस्ताव दिल्याचं जे सांगतात, त्यांनी इतर उद्धव ठाकरेंनी संमत केलेले इतर प्रकल्प राज्याबाहेर का जाऊ दिले? असा खणखणीत सवाल केला. तसंच खुद्द उदय सामंत यांनी इथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला कसा विरोध केला होता, त्याची देखील आठवण करून दिली.































































