विनेश फोगाटला जबर धक्का, दुखापतीमुळे आशियाई स्पर्धेतून माघार

हिंदुस्थानची अनुभवी कुस्तीपटू विनेश पह्गटच्या पायाला सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तिच्यासह कुस्ती संघालाही जबर धक्का बसला आहे. आशियाई स्पर्धेत खेळण्यासाठी झगडत असलेल्या विनेशला आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे 19 वर्षीय अंतिम पंघालचा आशियाई स्पर्धेतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. दुखापतीमुळे विनेशसाठी जागतिक कुस्ती स्पर्धाही कठीण आहे. मात्र या झुंजार कुस्तीपटूची कुस्तीच्या मैदानाऐवजी सरावाच्या मैदानातूनच झालेली माघार सामान्य कुस्तीपटूंना खटकू लागली आहे.

येत्या 23 सप्टेंबरपासून चीनच्या हांगझाऊ शहरात होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 28 वर्षीय विनेश महिलांच्या 53 किलो वजनी गटात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार होती. विनेश व बजरंग पुनिया या दोघांची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट हिंदुस्थानी संघात निवड करण्यात आली. या कुस्तीपटूंनी काही महिन्यांपूर्वी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात छेडलेल्या आंदोलनामुळे त्यांचा प्रचंड वेळ वाया गेला. तसेच ते आशियाई व राष्ट्रकुल पदकविजेते असल्याने त्यांना हिंदुस्थानी कुस्ती महासंघाच्या हंगामी समितीने सूट दिली होती.

 2018 च्या आशियाई स्पर्धेत विनेशने सुवर्णपदक मिळवले होते. तसेच 2014, 2018, 2022 या तिन्ही वेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णकमाई केली होती. विनेशच्या माघारीमुळे कुस्तीप्रेमींना धक्का बसला आहे.

 बेलग्रेड येथे 16 ते 24 सप्टेंबरदरम्यान जागतिक कुस्ती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानी खेळाडूंची निवड चाचणी 25 26 ऑगस्ट रोजी पतियाळा येथे होणार आहे. विनेशला नाइलाजास्तव या स्पर्धेलाही मुकावे लागणार आहे. मात्र आशियाई स्पर्धेप्रमाणे येथे अंतिमला प्रवेश मिळणार नाही. तिला निवड चाचणीचा अडथळा पार करूनच जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवावे लागेल.

मला तुम्हा सर्वांना अत्यंत दुःखद गोष्ट सांगायची आहे. 13 ऑगस्ट रोजी बुडापेस्ट येथे सरावादरम्यान माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली. वैद्यकीय चाचणीनंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार माझ्या पायावर शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. 17 ऑगस्ट रोजी मुंबईत माझ्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यामुळे आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत मी सहभागी होऊ शकणार नाही,’ असे विनेश म्हणाली.

बजरंग सध्या काय करतो?

 विनेशच्या माघारीनंतर समाज माध्यमांवर सध्या बजरंगविषयी फार चर्चा रंगत आहे. पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात बजरंग पदकाचा प्रबळ दावेदार आहे.

 29 वर्षीय बजरंगने 2018 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण, तर 2018 व 2022 च्या राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण पटकावले आहे. त्याशिवाय 2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने कास्यपदक प्राप्त केले.

 आशियाई स्पर्धेच्या निवड चाचणीत विशाल कालीरमनने 65 किलो गटात जेतेपद मिळवले. मात्र त्यालाही सध्या राखीव खेळाडूत स्थान देण्यात आले आहे. बजरंगने माघार घेतली, तरच विशालला प्रवेश देण्यात येईल.

 बजरंग सध्या सोनीपत येथे सराव करत असून तो आशियाई स्पर्धेत खेळणार असल्याचे आतापर्यंत समजते.