
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यभरातील तब्बल 1300 शाळांमधील शिक्षक 100 टक्के अनुदानाच्या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत वर्गावर शिकवायला जायचे नाही असा पवित्रा या शिक्षकांचा आहे. काँग्रेस आमदार विक्रम काळे यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे याकडे लक्ष वेधले असता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी ज्या शाळा अनुदानासाठी पात्र आहेत त्या शाळांची यादी जाहीर करू अशी घोषणा केली.
शिक्षकांनी शिकवणीवरच बहिष्कार टाकल्यामुळे दहावीच्या स्कॉलरशिपला बसलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहेत. तसेच दहावीच्या परीक्षेचे अर्जही अजून भरण्यात आलेले नाहीत. शिक्षकच वर्गावर नसतील तर या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यातही मोठी अडचण येणार आहे याकडेही काळे यांनी यावेळी लक्ष वेधले. गेल्या आठवडाभरापासून शिक्षकांनी आझाद मैदानात धरणे धरले आहेत. अनुदान नसल्यामुळे अनेक शाळांची परिस्थिती वाईट असून शिक्षकांना पगारही मिळालेले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत शाळांना 100 टक्के अनुदान मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे. या मुद्दय़ावरून काळे आक्रमक झाले. यावेळी विविध मागण्यांवर गदारोळ सुरू होता.
























































