
सामना ऑनलाईन । ढाका
बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार निवडणुकी दरम्यान झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. निवडणुकीबीबत कोणत्याही अफवा पसरल्या जाऊ नयेत, म्हणून बांगलादेशात रविवार रात्रीपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे.
बांगलादेशात आवामी लीग पक्षाच्या नेत्या आणि पंतप्रधान शेख हसिना या चौथ्यांदा पंतप्रधान पदाच्या शर्यंतीत असून त्यांना बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या बेगम खालिदा झिया यांनी आव्हान दिले आहे. खालिदा झिया यांनी तीन वेळा बांगलादेशाचे पंतप्रधानपद भूषविले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खालिदा झिया फेब्रुवारी 2018 पासून तुरुंगात आहेत.
संसदेच्या 300 जागांपैकी 299 जागांसाठी 1848 उमेदवार आपले नशिब आजमावणार आहेत. मतदान सुरळीत पार पडावं यासाठी हजारो लष्कराचे जवान आणि पोलीस तैनात आहेत. या निवडणूकीत विजय मिळवल्यास शेख हसिना या चौथ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होतील.



























































