बिप्लव देवांचे उलटापुलटा सुरूच, रवींद्रनाथ टागोर यांनी ‘नोबेल’ परत केले होते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । आगरतळा

वादग्रस्त विधान करण्याची मालिका त्रिपुरातील भाजपचे मुख्यमंत्री बिप्लवकुमार देव यांनी सुरूच ठेवली आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून महान साहित्यिक, कवी रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिशांनी दिलेला नोबेल पुरस्कार परत केला होता असे तारे मुख्यमंत्री देव यांनी तोडले आहेत. दरम्यान, ज्याविषयी आपल्याला माहिती नाही त्या ऐतिहासिक घटनांबद्दल बिप्लव देव यांनी तोंड बंद ठेवावे असा सल्ला विरोधकांनी त्यांना दिला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देव म्हणाले, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी इंग्रजांनी दिलेला नोबेल पुरस्कार परत केला. त्यांच्या या विधानावर जोरदार टीका होत आहे. वास्तविक जालियनवाला बाग हत्याकांडानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिशांनी दिलेला ‘नाइटहूड’ पुरस्कार परत केला होता. नोबेल पुरस्कार हा ब्रिटन सरकार देत नाही तर स्वीडिश अकादमी देते.