
लग्नासाठीच्या विविध जाहिराती तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचल्या असतील. नोकरी करणारा, सुयोग्य, विशिष्ट वयातील, अमूक धर्माचा आणि जातीचा नवरा हवा अशा जाहिराती आपण वाचल्या असतील. परंतु एक जाहिरात सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. जाहिरात देणाऱ्या मुलीला हवाय न पादणारा आणि ढेकर न देणारा नवरा.
एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये आलेली जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. जाहिरात देणाऱ्या मुलीला लग्नासाठी देखणा, 25 ते 28 वयोगटातला, मोठा व्यवसाय असणारा, बंगला किंवा 20 एकरातमध्ये फार्म हाउस असलेला, स्वयंपाककाम येणारा, ढेकर न देणारा आणि न पादणारा नवरा हवा आहे.
कोण आहे ही मुलगी?
अशी विचित्र जाहिरात देणारी मुलगी आहे तरी कोण याबाबत तुम्हाला उत्सुकता लागली असेलच… तर फेमिनिस्ट, 30 वर्षांवरील सुसिक्षित मुलगी, छोटे केस, पियर्सिंग केलेली आणि भांडवलशाहीविरोधात काम करणारी, अशी माहिती या मुलीने स्वत:बाबत दिली आहे.
अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट
दरम्यान, ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री रिचा चढ्ढा हिला देखील ती शेअर केल्यावाचून राहावले नाही. रिचाने ‘टूलकिट फॉर हॉट टेकस’ नावाच्या एका ट्विटर युजरने पोस्ट केलेला फोटो शेअर केला असून ‘तेथे कोणीतरी तुमची वाट पाहात आहे’, असे कॅप्शन दिले आहे. यावर नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
someone out there is waiting for you https://t.co/tpv5IqcjU2
— TheRichaChadha (@RichaChadha) June 15, 2021
प्रँक की सत्य?
व्हायरल जाहिरातीबाबत ‘बीबीसी’ने एक अहवाल प्रसिद्ध केला असून हा एक प्रँक असल्याचे म्हटले आहे. महिलेच्या भावाने आणि मित्रांनी वाढदिवशी चेष्टा म्हणून ही जाहिरात वृत्तपत्रात छापायला दिली होती. जाहिरातीत दिलेल्या मेल आयडीवर संपर्क साधल्यानंतर याचा खुलासा झाला.




























































