विराट कोहली ते मोहम्मद सिराजपर्यंत…हे पाच खेळाडू गाजवू शकतात क्वालिफायर 1चा सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विराट कोहली

विराट कोहली हा आरसीबीचा स्टार फलंदाज आहे. विराट हा मोठय़ा सामन्यांसाठी ओळखला जातो. त्याच्यामध्ये कोणत्याही सामन्याचे चित्र एकहाती पालटण्याची ताकद आहे. या मोसमात तो दमदार फॉर्ममध्ये असून, त्याने 14 सामन्यांमध्ये 163च्या स्ट्राईक रेटने 557 धावा केल्या आहेत. जर विराटने पहिल्या क्वालिफायरमध्येही हाच फॉर्म कायम ठेवला तर आरसीबीचा अंतिम फेरीचा मार्ग अधिक सोपा होऊ शकतो.

मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराज हा गुजरात टायटन्ससाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरत आहे, कारण त्याने आतापर्यंत संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. धर्मशाळा येथे सिराजच्या चेंडूला चांगला स्विंग मिळू शकतो आणि जर गुजरातने प्रथम गोलंदाजी केली तर तो खूप घातक ठरू शकतो. सिराजला कामगिरीत सातत्य राखणे जमलेले नसले तरी मोठय़ा सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी तो ओळखला जातो. सिराजने आतापर्यंत 14 सामन्यांत 17 विकेट्स मिळवल्या आहेत.

भुवनेश्वर कुमार

या आयपीएलमध्ये पर्पल कॅप ज्याने सोडलेली नाही तो म्हणजे आरसीबीचा हुकमी गोलंदाज भुवनेश्वर कुमार. आतापर्यंत स्पर्धेत भुवीने कमालीचे असे सातत्य दाखवले आहे, जे कोणालाही जमलेले नाही. त्यामुळे क्वालिफायर 1 या सामन्यात आरसीबीची गोलंदाजी कसा आकार घेते हे भुवनेश्वर कुमारच्या चार षटकांवर अवलंबून असेल. आयपीएल 2026 मध्ये भुवनेश्वर सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज राहिला आहे. त्याने 14 सामन्यांत 24 बळी मिळवले आहेत.

साई सुदर्शन

साई सुदर्शनने आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. सुदर्शन डावाची उभारणी करू शकतो आणि आक्रमकपणे फलंदाजी करत धावगतीही वाढवू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तो सातत्याने धावा करत आहे आणि दडपण झुगारून फलंदाजी करत आहे. त्याने 14 सामन्यांमध्ये 157 च्या स्ट्राइक रेटने 638 धावा केल्या आहेत.

शुभमन गिल

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीच्या गोलंदाजांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो. गिल सध्या दमदार फॉर्ममध्ये असून त्याने या हंगामातील 14 सामन्यांत 616 धावा केल्या आहेत. शुभमनकडे जास्त जोखीम न घेता गोलंदाजांवर दबाव आणण्याची क्षमता बाळगतो, त्यामुळे तो जेवढा काळ खेळपट्टीवर राहील तेवढी आरसीबीची डोकेदुखी वाढत जाईल.