दक्षिण आफ्रिका दौरा आणि विराट कोहली संदर्भात मोठी बातमी, सूत्रांनी दिली महत्त्वाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे की विराट कोहली पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. काही पदाधिकाऱ्यांसह बोर्डातील सूत्रांच्या माहितीच्या आधारे क्रिकबझने ही माहिती दिली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेला 19 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

“विराटने एकदिवसीय सामन्यांसाठी गैरहजर राहण्याच्या वृत्तात तथ्य नाही,” असे बीसीसीआयच्या एका मुख्य सदस्याने सांगितले. तर सूत्रांनी कोहलीच्या दिलेला शब्द पाळणारा क्रिकेटर असल्याचा पुनरुच्चार केला आहे. “तो पूर्णपणे वचनबद्ध क्रिकेटर आहे आणि तो एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सहभागी होईल याबद्दल कोणतीही शंका नाही.”, असेही त्यांनी सांगितले.

एकदिवसीय सामन्यांमध्ये नुकत्याच झालेल्या कर्णधार बदलाच्या पार्श्वभूमीवर आणि 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये नेतृत्वाच्या भूमिकेवरून कोहली नाखूष असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे विराट एकदिवसीय सामने खेळणार याला महत्त्व प्राप्त झालं आहे. यापूर्वी T20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त झालेल्या रोहित शर्माची एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठीही कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

बीसीसीआय किंवा निवड समितीचा सदस्य कोहलीच्या संपर्कात असल्याची कोणतीही माहिती नाही, परंतु बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत असल्याची खात्रीशीर माहिती मिळते आहे. बुधवार, 15 डिसेंबर म्हणजेच आज BCCI ने प्री-टूर पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी कोहलीकडून यावर स्पष्टीकरण येणे अपेक्षित आहे.

दरम्यान, रोहित एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कर्णधार म्हणून आपली भूमिका पार पाडू शकेल की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सूत्रांनी सांगितले की, रोहितला नुकत्याच मुंबईत झालेल्या सराव सत्रादरम्यान ‘डाव्या हाताला दुखापत झाल्यामुळे’ कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली, त्याच्यावर बीसीसीआयच्या फिजिओच्या देखरेखीखाली निरीक्षण केले जात आहे.