
अमेरिकेच्या कायद्यांचे किंवा इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्हिसाधारकांना डिपोर्ट म्हणजेच मायदेशी रवानगी केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुंबईतील अमेरिकन दूतावासाने दिला आहे. या इशाऱ्यामुळे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने लागू केलेल्या कठोर इमिग्रेशन नियमांमधून कोणताही दिलासा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेच्या दूतावासाने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक निवेदन जारी केले. “व्हिसा जारी झाल्यानंतर अमेरिकन व्हिसाधारकांची तपासणी थांबत नाही. सर्व अमेरिकन कायदे आणि इमिग्रेशन नियमांचे पालन केले जात आहे की नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही व्हिसाधारकांची सातत्याने तपासणी करतो. जर कोणी या नियमांचे पालन केले नाही तर, आम्ही त्यांचे व्हिसा रद्द करून त्यांना त्यांच्या मायदेशात डिपोर्ट करू”, असे अमेरिकेने म्हटले आहे.
यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात दूतावासाने असाही इशारा दिला की, अर्जदारांनी त्यांच्या सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीबद्दल चुकीची माहिती दिल्यास किंवा कोणतीही माहिती लपवल्यास, त्यांचा व्हिसा अर्ज फेटाळला जाऊ शकतो आणि ते कायमस्वरूपी अपात्रही ठरू शकतात.
तसेच जे लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करतील, त्यांना तुरुंगवास होऊ शकतो आणि त्यांची मायदेशी रवानी गेली जाईल. इमिग्रेशन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाऊ शकते, देशाबाहेर पाठवले जाऊ शकते आणि भविष्यात व्हिसा अर्ज करण्यापासून रोखले जाऊ शकते, असेही अमेरिकन दूतावासाने स्पष्ट केले होते.
































































