लंडनमध्ये विठुनामाचा गजर, युरोपमध्ये साकारणार विठ्ठल मंदिर

लंडनमध्ये आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. विठुनामाच्या जयघोषाने लंडन दुमदुमले. आषाढी वारी करण्याची ओढ युकेतील भक्तांना असते. प्रत्यक्षात पंढरीला जाता येत नसले तरी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी वारीची अनुभूती घेतली. महाराष्ट्र लंडन मंडळ, गजानन महाराज युके परिवार ट्रस्ट, विश्व वारकरी संस्था आणि ग्लोबल वारी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लंडन येथे आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा एकत्रितपणे उत्साहात साजरी करण्यात आली. गायक मनोज गोविंदराज यांनी संत तुकाराम आणि संत नामदेव यांचे अभंग सादर केले. एकंदरीत वारी सोहळा उपस्थितांसाठी पर्वणी ठरला, अशी माहिती महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संतोष पारकर यांनी दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निरुपण मूळचे पंढरपूरचे असलेले डॉ. शिवानंद जाधव यांनी केले. गजानन महाराज युके परिवार ट्रस्ट यांनी भाविकांना एकत्र आणून युके आणि युरोपमधील पहिले सार्वजनिक विठ्ठल मंदिर स्थापन करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. या ठिकाणी विठ्ठल मंदिर, अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठे, स्वामी समर्थ, साईबाबा तसेच गजानन महाराज यांचे दर्शन घेता येईल. हे मंदिर केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक उपक्रमांचेही केंद्र असेल, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.