विटीदांडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळ तोरसकर

विटीदांडू हा खेळ पारंपरिक असून खूप मजेशीर खेळ आहे. या खेळामध्ये झाडाचे लाकूड दांडू स्वरूपात वापरले जाते. याशिवाय विटीसाठी झाडाच्या लाकडाचा छोटासा भाग घेऊन त्याला दोन्ही बाजूने टोक केले जाते.

भरपूर व्यायाम व मनोरंजनाने आणि उत्साहाने भरलेला खेळ म्हणजे विटीदांडू. विटीदांडू हा आपला देशी खेळ असून शहरांपेक्षा खेडय़ापाडय़ातच जास्त खेळला जातो. पूर्वी यासाठी वेगवेगळय़ा प्रांतात वेगवेगळे नियम होते. खरे तर विशेष अशी नियमावली नव्हतीच. हा खेळ महाभारताच्या आधीपासून खेळत असल्याचे दाखले इतिहासात सापडतात. यादवकाळ, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, मुक्तेश्वर आदींनी या खेळाचे उल्लेख/वर्णन केलेले आहे. विटीदांडू हा मराठी मातीतील पूर्वीपासून खेळला जाणारा एक खेळ आहे. हा खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही खेळला जाई. यामध्ये एक लांब लाकडी दांडू असतो व लाकडापासून तयार केलेली छोटी विटी असते. विटीदांडू हा खेळ पारंपरिक असून खूप मजेशीर खेळ आहे. या खेळामध्ये झाडाचे लाकूड दांडू स्वरूपात वापरले जाते. याशिवाय विटीसाठी झाडाच्या लाकडाचा छोटासा भाग घेऊन त्याला दोन्ही बाजूने टोक केले जाते.

हिंदुस्थानात हा खेळ सर्वत्र खेळला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांत तो विशेष लोकप्रिय आहे. उत्तर हिंदुस्थानात ‘गुल्ली (गिल्ली) डंडा’ या नावाने तो खेळला जातो. या खेळाचे अनेक प्रकार आहेत. विटी साधारण दोन ते पाच इंचांच्या (५ ते १३ सेंमी.) दरम्यान लांब आणि एक ते सवा इंच (सुमार ३ सेंमी) व्यासाची आणि दोन्ही बाजूंना निमुळती टोकदार असते. दांडू मुठीत धरता येईल इतका म्हणजे सुमारे सवा इंच (सुमारे ३ सेंमी) व्यासाची आणि दोन्ही बाजूंना निमूळती टोकदार असते. दांडू मुठीत धरता येईल इतका म्हणजे सुमारे दीड इंच (४ सेंमी) व्यासाचा व सुमारे दीड फूट लांब (४५ सेंमी) असून त्याचे एक टोक तासून चपटे वा टोकदार केलेले असते. खेळाआधी सुमारे तीन x दीड इंच  आकाराची व टोकांना निमुळती अशी जमिनीत एक खोलगट खाच करतात. तिला ‘गली’ असे म्हणतात. या खेळात खूप खेळाडू सहभागी होऊ शकतात. हा खेळ वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही पद्धतीने खेळता येतो. ओलीसुकी (टॉस) करून राज्य कुणावर ते ठरवले जाते. एखाद्या चपटय़ा खापरीला किंवा चपटय़ा दगडावर एका बाजूला थुंकी लावून ओलीसुकी केली जाते. जो ओलीसुकी जिंकतो तो पहिल्यांदा विटी उडवतो. आता मात्र नाणेफेक घेऊन निर्णय घेण्याची पद्धत सुरू झाली आहे. जमिनीवर छोटासा खड्डा खोदून (विटीसाठी केलेल्या खड्डय़ाला गल किंवा गली म्हणतात) त्यावर विटी ठेवली जाते.

या गलीवर विटी आडवी किंवा उभी ठेवून आणि तिच्या मागे दांडू टेकवून एक खेळाडू ओणवा होऊन ती विटी उडवतो. त्या वेळेस बाकीचे सर्व खेळाडू मैदानात विटी झेलण्यासाठी उभे असतात. त्या वेळेस जर कोणत्याही खेळाडूने विटी झेलली तर विटी मारणारा खेळाडू बाद होतो. विटीचा झेल घेता आला नाही तर मग त्या गलवर दांडू आडवा ठेवायचा. मग प्रतिस्पर्धी खेळाडू त्याला विटीने मारण्याचा प्रयत्न करतात. जर दांडूला विटी लागली तर खेळाडू बाद. तो बाद झाला नाही तर मग त्याने विटीने गुण मिळवायचे. यासाठी विटीच्या एका टोकावर दांडू मारून ती विटी हवेत उडवायची आणि जमिनीवर पडू न देता वरच्यावर उडवायची. विटी केवळ दांडूच्या सहाय्याने हवेत उडवणे हे या खेळातले सगळय़ात मोठे कसब असते. त्यानंतर दांडूच्या सहाय्याने विटी बॅटने बॉल मारतो त्याप्रमाणे दूर भिरकवायची. ती जिथे पडेल तिथे जाऊन पुन्हा ती दूर भिरकवायची. हे करताना विटी जमिनीवर पडली की खेळाडू बाद होतो. हा खेळाडू विटी घेऊन जाईल तिथून त्याने पार केलेल्या अंतराच्या प्रमाणात अंक मोजले जातात. विटी एकदाच मारली तर हे अंतर दांडूने मोजले जाते. विटी हवेत एकदा हलकेच उडवून मारली असेल तर अर्ध्या दांडूने हे अंतर मोजले जाते आणि जर हवेतल्या हवेत दोन वेळा विटीला उडवले असेल तर विटीने मोजायचे. साहजिकच ज्याचे कौशल्य जास्त असेल त्याचे गुण जास्त होतात. असा हा खेळ नक्कीच सर्वांच्या आवडीचा झाला असून याच्या संघटनासाठी क्रीडा कार्यकर्ते खूप मेहनत घेताना दिसतात. त्यामुळे आता फरक पडला असून विविध संघटना यासाठी काम करत आहेत व या खेळला राजमान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.