कुरापतखोर पाकिस्तानात सध्या सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. इम्रान खान यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी करण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. इम्रान यांच्याविरुद्ध मांडलेल्या अविश्वास ठरावावर 22 मार्चला मतदान होऊन त्याचा अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांच्या हालचालींमुळे चवताळलेल्या इम्रान यांनी विरोधकांवर जळफळाट सुरू केला आहे.
इम्रान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव नॅशनल असेम्बलीच्या अध्यक्षांपर्यंत पोहोचला आहे. ठरावावरील मतदानाच्या तारखेचा फैसला नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष घेणार आहेत. राजकीय जाणकारांच्या मते, 22 मार्चला विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते. त्याचवेळी अविश्वास ठरावावर मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इम्रान यांना कधीही पंतप्रधानपदाची खुर्ची सोडावी लागू शकते. पाकिस्तानी संविधानाच्या कलम 95 च्या तरतुदीनुसार पंतप्रधानांविरुद्ध सात दिवसांच्या आत अविश्वास ठराव मंजूर करणे बंधनकारक आहे. देशातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता इथला सत्तासंघर्ष अंतिम टप्प्यात पोहोचल्याचेच स्पष्ट चित्र आहे.
- पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण 341 जागा आहेत. इम्रान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावाच्या मंजुरीसाठी 172 मते आवश्यक आहेत. विरोधकांनी आपल्याला 200 सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. अविश्वास ठरावावर ओपन बॅलेटच्या माध्यमातून मतदान होणार आहे.
- नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान यांच्या पीटीआय पक्षाचे सर्वाधिक 144 सदस्य आहेत. मात्र यातील अनेक जण आमच्या संपर्कात असल्याचा दावा करीत विरोधकांनी इम्रान यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. इम्रान यांना सत्तेतून बाहेर काढण्याच्या मोहिमेवरच विरोधी पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे.





























































