
मनपा कर्मचारी धीरज परदेशी हत्याकांडातील आरोपींचे पाकिस्तान आणि पॅलेस्टाइनशी कथित संबंध, पोलीस तपासाची दिशा, हिंदूंच्या घरांवर कथित अतिक्रमण, तसेच धार्मिक तेढ निर्माण करणाऱया घटनांबाबत सत्ताधारी आमदारांनी केलेल्या आरोपांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर परदेशी हत्याकांड प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी अहिल्यानगर महानगरप्रमुख किरण काळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेकडे केली.
धीरज परदेशी यांच्यावरील हल्ल्यानंतर 10 ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या आवाहनावरून ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत आमदार जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांनी केलेल्या वक्तव्यांवर किरण काळे यांनी टीका केली. या सभेच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अहिल्यानगर पेटण्यापासून वाचविण्याचे काम पोलिसांनी केले, असे काळे म्हणाले.
परदेशी हत्याकांडातील आरोपींचे पाकिस्तान, पॅलेस्टाईनशी संबंध असल्याचे आरोप आमदार जगताप आणि संग्राम भंडारे यांनी केल्याचा दावा करत काळे म्हणाले, जर हे आरोप खरे असतील, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित नेत्यांना नोटीस बजावून त्यांचे जबाब नोंदवावेत, त्यांच्याकडील पुरावे ताब्यात घ्यावेत आणि तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे द्यावा, अशी मागणी किरण काळे यांनी केली आहे.
धीरजच्या कुटुंबीयांना मदत कधी मिळणार?
धीरज परदेशी याच्या कुटुंबीयांना आतापर्यंत कोणतीही आर्थिक मदत राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. कुटुंबीयांना नोकरी देण्याबाबत जी काही वक्तव्य केली गेली, त्यावरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही, याकडे लक्ष वेधत परदेशी कुटुंबीयांना मदत कधी मिळणार, असा सवाल किरण काळे यांनी केला.



























































