मध्य प्रदेशात पक्ष सोडणाऱया नेत्यांना मतदारांनी नाकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vote-election-ink

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला 230 जागांपैकी तब्बल 163 जागा मिळाल्या आहेत. राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राज्यात भाजपची लाट आली असताना काँग्रेस पक्ष सोडणाऱया नेत्यांना मात्र मतदारांनी सपशेल नाकारले आहे. काँग्रेस पक्षाला सोडून भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या 8 समर्थकांचा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे.

काँग्रेस पक्षाला सोडून अनेक जण ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत गेले. त्यातील 13 समर्थकांना तिकीट देण्यास ज्योतिरादित्य सिंधिया यांना यश आले, परंतु या 13 पैकी 8 उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात भाजपची सत्ता येणार असूनही ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. आपल्या समर्थकांना विजयी करण्यासाठी सिंधिया यांनी जिवाचे रान केले. अनेक सभा घेतल्या. जोरदार प्रचार केला, परंतु मतदारांनी आयाराम-गयाराम संस्कृतीला सपशेल नकार दिला आहे.

चंबल अंचलच्या 34 जागांपैकी भाजपला 18 जागांवर विजय मिळाला आहे, तर काँग्रेसच्या खात्यात 16 जागा आल्या आहेत, परंतु या ठिकाणी 13 जागांवर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपले समर्थक उभे केले होते. यातील 8 समर्थकांचा दारुण पराभव झाला आहे. ज्या समर्थकांचा पराभव झाला आहे त्यात रघुराज सिंह पंसाना, कमलेश जाटव, इमरती देवी, माया सिंह, सुरेश धांकड, महेंद्र सिसोदिया, जसपाल जज्जी आणि हिरेंद्र सिंह बना यांचा समावेश आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत ग्वालियर, चंबल आणि अंचल येथून काँग्रेसला 26 जागांवर विजय मिळाला होता. याचे श्रेय काँग्रेसने ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिले होते.