प्रतापगड सहकारी साखर कारखान्यासाठी 13 मार्चला मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जावली तालुक्यातील सर्वांत मोठा व एकमेव सहकारी कृषी, औद्योगिक प्रकल्प असलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमानुसार 13 मार्च रोजी मतदान, तर 14 मार्चला मतमोजणी होणार आहे.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) धनंजय डोईफोडे यांच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक यांच्या कार्यालयातून प्रतापगड साखर कारखान्याच्या निवडणुकीसंबंधी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामध्ये व्यक्ती व ऊस सभासद गटातून एकूण 15 जागा आहेत. त्यामध्ये कुडाळ, खर्शी-सायगाव, हुमगाव, मेढा, महाबळेश्वर अशा पाच गटांतून संचालक मंडळाच्या प्रत्येकी तीन जागा आहेत. उत्पादक संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था 1, महिला 2, अनुसूचित जाती व जमाती 1, विमुक्त जाती व भटक्या जमाती 1, इतर मागास प्रवर्ग 1 अशा एकूण 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

दि. 4 ते 10 फेब्रुवारीदरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. 11 फेब्रुवारीला दाखल अर्जांची छाननी होईल. दि. 28 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 2 मार्चला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. त्याचदिवशी चिन्हांचे वाटपही होईल. आवश्यक असल्यास दि. 13 मार्चला सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान व दि. 14 रोजी सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होणार आहे.