
मुंबईतील उच्चभ्रूंपासून झोपडपट्टीतील नशेबाजांना हेरॉईन ड्रग्ज सप्लाय करणारी महिला ड्रग्जमाफिया अमिना हमजा शेख ऊर्फ लाली अमली पदार्थविरोधी कक्षाच्या हाती लागली आहे. राजस्थानातून हेरॉईन ड्रग्ज मुंबईत आणून स्थानिक पेडलरर्सकरवी ड्रग्ज पुरविण्याचे काम ती करत होती. पोलिसांनी तिच्याकडून 21 कोटी 60 लाख किमतीचा सात किलो हेरॉईनचा साठा हस्तगत केला आहे.
काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलेल्या तिघा ड्रग्ज तस्करांच्या चौकशीतून तस्करांच्या साखळीची माहिती मिळाली होती. त्याआधारे घाटकोपर युनिटच्या प्रभारी निरीक्षक लता सुतार यांनी एपीआय खान, उपनिरीक्षक सचिन पालवे व पथकासह तपास केला. लाली ही हेरॉईनचा साठा घेऊन वडाळा ट्रक टर्मिनस येथील म्हाडा चाळ फुटपाथवर येणार असल्याचे कळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून लालीला पकडले. या प्रकरणात आणखी ड्रग्ज सप्लायर लवकरच गजाआड होतील असे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.






























































