
एकाच कर्मचाऱ्याला प्रसूती आणि बाल रुग्णालयाकडून दोन वेतन, आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात डॉक्टर-कर्मचाऱ्यांची भरती आणि माफक दरात औषधोपचार दिले जात नसल्यामुळेच वाडिया हॉस्पिटलचे 10 टक्के मानधन रोखले असल्याचे स्पष्टीकरण पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आज दिले. दरम्यान, रुग्णालयातील अनियमिततांबाबत उद्या पालिका आणि वाडिया ट्रस्ट यांची निर्णायक बैठक होणार असून तोडगा काढला जाईल. वाडिया रुग्णालय बंद पडू देणार नाही अशी ग्वाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
पालिकेकडून मिळणारे अनुदान गेल्या काही महिन्यांपासून मिळाले नसल्यामुळे औषधे आणि वेतनासाठी निधी कमी पडत असल्याचे सांगत वाडिया रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना परत पाठवले जात आहे. मात्र वाडिया रुग्णालयाच्या कारभारात अनियमितता आढळल्यामुळेच पालिका प्रशासनाने 10 टक्के निधी रोखून ठेवला असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गिरणी कामगारांना-गोरगरीबांना माफक दरात उपचार मिळावेत म्हणून 1926-28 मध्ये पालिकेसोबत करार झाल्यानंतर रुग्णालय सुरू झाले. सुरुवातीला प्रत्येक 120 खाटांच्या रुग्णालयात सध्या खाटांची संख्या प्रत्येकी 525 वर गेल्याची माहिती काकाणी यांनी दिली. यामुळे रुग्णालयाचा खर्च मोठय़ा प्रमाणात वाढल्याचेही त्यांनी सांगितले. खाटा वाढवणे, कर्मचारी भरती करणे याबाबत वाडिया ट्रस्टने पालिकेला कोणतीही माहिती दिली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या गटनेता बैठकीला सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष सदा परब, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, विरोधी पक्षनेता रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, ‘सपा’चे रईस शेख, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. दरम्यान, वाडियातील कर्मचाऱ्यांसह रुग्णांचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असून वाडिया रुग्णालय बंद पडू देणार नाही असे आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनीही सांगितले.
रुग्णालय कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
वाडिया रुग्णालयात निधी अभावी रुग्णालयातील औषधांचा साठाही संपत आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांचा पगारही देणे कठीण झाले आहे. निधी नसल्याने नवीन रुग्णांना दाखल करून घेतल्यास त्यांना सुविधा देणे शक्य होत नसल्याचे सांगत रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना परत पाठवले जात आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. वाडिया बंद पडू देणार नाही असा निर्धार यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचेही आंदोलकांनी सांगितले.
चौकशीत आढळली अनियमितता
- दोन महिन्यांपूर्वी पालिकेने नेमलेल्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालातून वाडिया ट्रस्टच्या अनियमित कारभाराबाबत माहिती समोर आल्याचे काकाणी म्हणाले.
- गरीबांना मोफत किंवा माफक दरात केलेल्या उपचारांची माहिती, रुग्णांची माहिती ट्रस्टकडून पालिकेच्या चौकशी समितीला देण्यात आली नाही.
- रुग्णांकडे चौकशी केली असता रुग्णालयाकडून मोफत किंवा माफक दरात औषधोपचार दिले जात नसल्याचे चौकशी समितीला सांगण्यात आले. शिवाय रुग्णांकडून पालिकेच्या तुलनेत दुप्पट किंवा तिप्पट दर आकारले जातात.
- रुग्णालयात सहा व्यक्तींना प्रसूतिगृहाचे वेतन आणि बाल रुग्णालयाचे मानधनही मिळत असल्याचे समोर आले, तर दहा जणांना दोन्ही आस्थापनांकडून पेन्शन मिळत असल्याचे निदर्शनास आले.
- डबल मिळणारे वेतन 1 लाख 61 हजार 942 तर मानधन 1 लाख 65 हजार 512 आहे.
- कोणतीही मान्यता न घेता 399 खाटांची संख्या वाढवली.
- एकूण देणे रक्कम 21 कोटी
पालिकेकडून बाल रुग्णालयाला 100 टक्के तर प्रसूतिगृहाला 50 टक्के अनुदान दिले जात होते. बॅलन्शिटनुसार ही रक्कम देण्यात येत होती. मात्र यामध्ये अनियमितता आढळल्यामुळे 10 टक्के अनुदान रोखण्यात आले आहे. यामध्ये एकूण 21 कोटींची रक्कम पालिका वाडिया रुग्णालयाला देणार आहे. दरम्यान, पालिकेने रुग्णालयाचे 137 कोटी थकवले असल्याचे वाडिया ट्रस्टकडून सांगण्यात आले.
वाडिया हॉस्टिपलचा कारभार वाडिया ट्रस्टच्या माध्यमातून चालवला जातो. घेतलेल्या सर्व निर्णयांवर बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची देखरेख असते. त्यानुसारच गेल्या काही वर्षांत निर्णय घेण्यात आले आहेत. डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया रुग्णालय
























































