वाखरीत दोन एकरावरील दोडका पिकाचा उभा मंडप केला उद्ध्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाखरी येथे कृष्णदेव चव्हाण यांच्या शेतातील दोडका पिकाचा मांडव अज्ञाताने रात्रीतच कटरने कापल्याने संपूर्ण 2 एकर दोडका पिकाचा मांडव भुईसपाट झाला आहे. दोडका भाव तेजीत असतानाच हे कृत्य केल्याने चव्हाण यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

वाखरी येथील प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी कृष्णदेव सोपान चव्हाण यांनी 2 एकर दोडका पीक घेतले आहे. यापूर्वीही त्यांनी यशस्वीपणे दोडका लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेतलेले आहे. यावर्षी त्यांनी 2 एकर क्षेत्रात दोडका पीक घेतले होते. त्यासाठी लोखंडी तारेचा मांडव केला होता. पिकाची लागवड, मशागत, तारेचा मांडव, बांबू असा दोन एकरात सुमारे 4 लाख रुपयांचा खर्च त्यांनी केला होता. मागील 15 दिवसांपासून दोडक्याची काढणी सुरू होती. पुणे येथील बाजारात दोडक्याला चांगली मागणी होती. आठ दिवसांत जवळपास 1 लाख रुपयांचा दोडका विकला होता. दोडक्यास असलेला चालू बाजारभाव आणि भरघोस, उच्च प्रतीचे उत्पादन पाहता 2 एकरात 20 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते.

मात्र, रविवारी मध्यरात्री अज्ञाताने कटरने मांडवाच्या सर्व तारा कापून टाकल्या. त्यामुळे संपूर्ण मांडव भुईसपाट झालेला आहे. काढणी चालू असलेल्या दोडक्याचे पीकही त्यासोबत पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.