
बलात्कार केल्यानंतर ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून झाल्याची घटना मंगळवारी (दि. 14) रात्री वाळवा तालुक्यातील वाघवाडी येथील बांदल मळ्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, संबंधित महिलेचा पती आणि तिच्यात वारंवार वाद होत होते. याबाबत ईश्वरपूर पोलीस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात अनेकदा तक्रारी झाल्या आहेत.
ईश्वरपूर-शिवपुरी रस्त्यावरील बांदल मळ्यात मंगळवारी रात्री खुनाची ही घटना घडली. बुधवारी दुपारी स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. तिचा खून झालेल्या ठिकाणी दारूची बाटली, चकण्याच्या पुडय़ा, सिगारेट आणि तिच्या सोबतची पिशवी आढळली. पिशवीत तिचे कपडे, मेकअपचे साहित्य, आंबे पोलिसांना आढळून आले. तिचा खून अत्यंत निर्घृणपणे करण्यात आला आहे. ओढणीने गळा आवळल्यानंतर तिची मान मोडली आहे.
उपविभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून रात्री उशिरा उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवला होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.





























































