
सामना प्रतिनिधी । नांदेड
गणपूर ता.अर्धापूर येथे तेरा दिवसापूर्वी एका घरात दरोडा टाकून फरार झालेले दरोडेखोर नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने वरोडा, चंद्रपूर येथून पकडून आणले आहेत. या पकडलेल्या चार दरोडेखोरांना पुढील कार्यवाहीसाठी अर्धापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
दि.१६ नोव्हेंबर २०१८ रोजी मध्यरात्रीनंतर १.३० ते २ या वेळेदरम्यान संभाजी एकनाथ मोहिते यांच्या घराच्या दरवाजा तोडून काही दरोडेखोर आत घुसले. त्यांनी घरातील व्यक्तींना चाकूने आणि कोयत्याने मारहाण करुन बळजबरी घरातील सोने,चांदी, रोख रक्कम व मोबाईल असा अंदाजे एक लाखपेक्षा जास्त रुपयांचा ऐवज घेवून गेले होते. अर्धापूर पोलिसांनी संभाजी मोहिते यांच्या तक्रारीवरुन अज्ञात दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल केला होता.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनात एक पथक या दरोड्याचा शोध घेत होते. स्थानिक गुन्हा शाखेला मिळालेल्या माहितीनुसार हा दरोडा माधव मोहिते व चांदू मोहिते दोघे रा.पुणे यांनी आपल्या साथीदारांसह टाकला असल्याची माहिती प्राप्त झाली. मग या दरोडेखोरांचा शोध सुरु झाला. नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने नांदेड, पुणे, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये या आरोपींचा शोध घेतला तेंव्हा पोलीस पथकाने तीन दरोडेखोरांना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा या गावातून पकडले आणि एकाला गणपूर गावातूनच ताब्यात घेतले. या सर्वांनी हा दरोडा टाकला असल्याची कबूली दिली आहे. आंतरराज्यीय दरोडेखोर म्हणून यातील चांदू मोहिते याचे नाव कुप्रसिध्द आहे. त्यांचा एक साथीदार लक्ष्मण मेटकर यास स्थानिक गुन्हा शाखेने दोन महिन्यापूर्वी पकडले होते. नांदेडसह तेलंगणा राज्यात बारा दरोड्यांचे गुन्हे लक्ष्मण मेटकरच्या नावाने नोंद आहेत. लक्ष्मण मेटकर सुध्दा याच दरोडेखोरांचा साथीदार आहे. पकडलेले चार दरोडेखोर माधव उर्फ रवी संभाजी मोहिते (२४) रा.पळसपूर ता.वसमत, जि. हिंगोली सध्या नन्हेगाव जि.पुणे, सचिन भास्कर जाधव (२३) रा.पिंपळशेंडा ता.मालेगाव जि.वाशिम, मोहंमद रियाज मोहंमद अली (२४) रा.हेकरीजान जि.मोरानहट (आसाम), सारंग शंकर गोदरे (२७) रा.गणपूर ता.अर्धापूर जि. नांदेड असे आहेत. या चौघांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी अर्धापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग भारती, पोलीस कर्मचारी महेश कुलकर्णी, शेख जावेद, ब्रम्हानंद लामतुरे, व्यंकट गंगुलवार, मोहंमद अलीम, शैलेश गुगडलवाड,धोंडीराम केंद्रे, बालाजी भिंगणकर, संग्राम केंद्रे यांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.































































