
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील डॉ. कदम रुग्णालय हे बेकायदा गर्भपातांचा अड्डा बनले आहे. या रुग्णालयामागे असणाऱ्या गोबर गॅसच्या टाकीमध्ये अर्भकांच्या 11 कवट्या आणि हाडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी या रुग्णालयाच्या प्रसूतीतज्ञ डॉ. रेखा कदम यांच्यासह परिचारिकांना अटक केली आहे.
13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बेकायदा गर्भपातप्रकरणी डॉ. कदम रुग्णालयाच्या प्रसूतीतज्ञ डॉ. रेखा नीरज कदम आणि गर्भपात करणाऱ्या मुलाच्या आईवडिलांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर चौकशी अधिकारी डॉ. ज्योत्स्ना गिरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने रुग्णालयाच्या आवारात पाहणी केली. त्यावेळी गोबर गॅसच्या टाकीमधील कवट्या पाहून त्यांना धक्का बसला.
सापडलेल्या कवटय़ा आणि हाडे वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत पाटील यांच्याकडे फॉरेन्सिक चाचणीसाठी सोपवण्यात आल्याची माहिती डॉ. गिरी यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयातील परिचारिका नलू सहारे, संगीता काळे यांना आज अटक केली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिली. रुग्णालयातील संगणक आणि रजिस्टरही पोलिसांनी जप्त केले आहे.
13 वर्षांच्या या मुलीवर एका 17 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केले होते. त्यामुळे ती गर्भवती राहिली होती. गर्भपात न केल्यास मुलीची बदनामी करण्याची धमकी मुलाच्या आईवडिलांनी दिली आणि 30 हजार रुपयांत डॉ. कदम रुग्णालयात तिचा गर्भपात केला होता.

























































