
मद्यपी मोटार चालकाने दिलेल्या धडकेत रस्त्यालगत वाहनातून साहित्य काढणाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना 25 मे रोजी पहाटे तीनच्या सुमारास वारजेत घडली. याप्रकरणी मोटारचालकास अटक करण्यात आली असून त्याने मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आले आहे.
संतोष सदाशिव जांभळे (वय 51, रा. सखाराम चाळ, आकुर्डी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोटाराचालक आकाश दत्तात्रय धुमाळ (वय 30, रा. वारजे माळवाडी) याला अटक केली आहे. प्रकाश भुवड (वय 32, रा. जयभवानीनगर, कोथरुड) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बाहेरगावाहून आल्यानंतर जांभळे हे 25 मे रोजी पहाटे तीनच्या सुमारास वारजे भागातील एका हॉस्पिटलसमोर थांबलेल्या वाहनातून साहित्य खाली काढत होते. त्यावेळी भरधाव मोटार चालक आकाशने त्यांना धडक दिल्यायामुळे अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मोटारचालक आकाश याला ताब्यात घेतले. त्याने मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय चाचणीत निष्पन्न झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक वाय. बी. पडवळे तपास करत आहेत.



























































