‘एव्हरेस्टकन्या’ मनीषा वाघमारेचे जल्लोषात स्वागत

92

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

जगातील सर्वोच्च उंचीवर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टचा शिखरमाथा सर करणाऱ्या मनीषा वाघमारेचा संभाजीनगरातील सरस्वती भुवन संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व एक लाख रुपये देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना मनीषा म्हणाली की, मी संभाजीनगरात परतल्यानंतर माझे एवढे मोठे स्वागत होईल हे मला अपेक्षित नव्हते, मात्र मी शहरात पाऊल ठेवताच माझी मिरवणूक काढून शहरात माझे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आल्याने मी सर्वांचे आभार मानते. मी एव्हरेस्टचा सागर माथा सर करताना माझ्या ऑक्सिजनचे रेग्युलेटर खराब झाले, मात्र तुमच्या सर्वाच्या आशीर्वादाने आज मी येथे उभी आहे. सरस्वती भुवन संस्थेने माझा सत्कार केल्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष बॅ.जे.एम.गांधी, सरचिटणीस अ‍ॅड.दिनेश वकील, सहचिटणीस डॉ.श्रीरंग देशपांडे, जुगलकिशोर धूत, ज्ञानप्रकाश मोदाणी, संस्थेचे सदस्य मिलिंद रानडे, संदीप नागोरी, आय.सी.एफ.चे कमांडर विनोद नरवडे, जगदीश खैरनार, स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.एस. खैरनार तसेच स.भु. विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदीप जब्दे़, अतुल कुलकर्णी, डॉ. दयानंद कांबळे, डॉ. विशाल देशपांडे, प्रवीण जोशी आदींचे आभारी आहे.

आई-वडिलांना पाहून डोळे पाणावले
मराठवाड्याची हिमकन्या आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मनीषा वाघमारे हिने अनंत संकटांना यशस्वीपणे सामोरे जात माऊंट एव्हरेस्ट शिखर फत्ते केले. त्यानंतर संभाजीनगरात परतल्यानंतर तिची आई सुमन वाघमारे आणि नीलम नरवडे यांनी तिचे औक्षण केले. याप्रसंगी मोहीम फत्ते केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता आणि यशस्वी मोहिमेनंतर आई-वडील, सर्व सहकारी यांना पाहून तिच्या डोळ्यांत आनंदाने अश्रू तरळताना दिसत होते. याप्रसंगी मनीषाचे वडील जयकृष्ण वाघमारे, आई सुमन वाघमारे, भाऊ विजय वाघमारे, बहीण दीक्षा वाघमारे, सुनीता मोरे उपस्थित होत्या.

विमानतळावर जोरदार स्वागत
भारत माता की जय, वंदे मातरम् अशा गगनभेदी घोषणा देत ‘आयसीएफ’चे कॅडेट आणि चाहत्यांनी मनीषा वाघमारे हिचे चिकलठाणा विमानतळावर जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर तिला जीपमध्ये बसवून रॅली काढण्यात आली. या रॅलीचा मार्ग विमानतळ, मुकुंदवाडी, एपीआय कॉर्नर, आविष्कार चौक, एमजीएम, आकाशवाणीमार्गे क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी असा होता. मिरवणुकीदरम्यान मनीषाचे ठिकठिकाणी जल्लोषात फटाक्यांच्या आतीषबाजीत स्वागत करण्यात आले. तसेच मार्गात तिच्या स्वागताचे मोठमोठे होर्डिंगदेखील लावण्यात आले होते. समारोपही फटाक्यांच्या आतषबाजीत सरस्वती भुवन येथे झाला. विमानतळावर ‘एमजीएम’चे सचिव अंकुशराव कदम, इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे, महिला महाविद्यालयाच्या सचिव कल्पलता भारस्वाडकर, प्राचार्या वसुधा पुरोहित, प्राचार्या रेखा शेळके, जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, सचिव गोविंद शर्मा, ‘आयसीएफ’चे नंदू पटेल, जगदीश खैरनार, आनंद आंचलकर, प्रभुलाल पटेल, राहुल अहिरे, किशोर नावकर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या