अंदाज चुकला आणि होत्याचे नव्हते झाले, वॉरेन बफे यांना धक्का; 31,600 कोटी गमावले

गुंतवणूक विश्वातील गुरू मानले जाणारे वॉरेन बफे काय बोलतात, काय निर्णय घेतात याकडे तमाम गुंतवणूकदारांचे लक्ष असते. भले-भले गुंतवणूकदार त्यांचे अनुकरण करत असतात. अत्यंत अभ्यासू व चाणाक्ष बफे यांनी गुंतवणुकीच्या माध्यमातून अब्जावधींचे साम्राज्य उभारले आहे. अचूक निर्णय घेण्याची हातोटी असलेल्या बफे यांचा अंदाज एका गुंतवणुकीबाबतीत मात्र चुकला आहे. त्यांना तब्बल 31,600 कोटींचा फटका बसला आहे. बफे यांच्या बर्पशायर हॅथवे कंपनीने ताळेबंदात तशी नोंद केली आहे.

बर्पशायर हॅथवेने काही वर्षांपूर्वी क्राफ्ट हिंज लिमिटेड या कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. रेडी टू ईट आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या व्यवसायात असलेली ही कंपनी सध्या अडचणींचा सामना करत आहे. क्राफ्ट फूड्स आणि हिंजच्या विलिनीकरणातून बनलेल्या या पंपनीचे शेअर 2015 पासून तब्बल 62 टक्क्यांनी घसरले आहेत.

तरीही बफे फायद्यात

क्राफ्ट हिंजच्या शेअरची किंमत अत्यंत कमी असताना बफे यांनी त्यात गुंतवणूक केली होती. मधल्या काळात ही किंमत वाढत गेली. सध्या ती 62 टक्क्यांनी घसरली असली तरीही वॉरन बफेंना किंचित फायदा होणार आहे. त्यांनी हे शेअर विकलेले नाहीत. बर्पशायर हॅथवेने ताळेबंदात गुंतवणुकीचे सध्याचे मूल्य दाखवले आहे. हे मूल्य आधीच्या तुलनेत 31,600 कोटींनी कमी आहे.