
भाजपकडे असे वॉशिंग मशीन आहे, ज्यामध्ये दहा वर्षे जुनी केस ठेवली तरी आरोपी पूर्णपणे स्वच्छ होऊन बाहेर येतो. यंत्रासोबतच मोदी वॉशिंग पावडरनेही हा चमत्कार घडवला आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते पवन खेडा यांनी भाजपवर सडकून टीका केली.
काँग्रेस नेते पवन खेडा यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी टेबलावर ठेवलेल्या वॉशिंग मशीनने सगळय़ांचे लक्ष वेधले. त्यावर बीजेपी वॉशिंग मशीन असे लिहिले होते. कोटय़वधींचे घोटाळे केल्याचा ज्या नेत्यांवर आरोप आहे, त्या नेत्यांचा पक्षात प्रवेश होताच त्यांची सर्व प्रकरणे भाजप मागे घेते, असे खेडा म्हणाले. तसेच त्यांनी ज्या प्रकरणांवर सध्या कारवाई सुरू आहे असे विरोधकांवरील 51 खटले मोजून दाखवले. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर 20 गुन्हे दाखल आहेत, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘प्रफुल्ल पटेल स्वच्छ होऊन बाहेर आले
खेरा म्हणाले, भाजपने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून ते भाजपसोबत गेल्यानंतर सीबीआयने प्रफुल्ल पटेल यांच्यावरील खटला बंद केला. प्रफुल्ल पटेल वॉशिंग मशीनमध्ये गेले आणि स्वच्छ होऊन बाहेर आले. हे फक्त एक नाव नाही तर अशी 21 नावे आहेत.




























































