
उन्हाळ्यानंतर येणारा पावसाळा अनेकांना हवाहवासा वाटतो. मात्र त्याचवेळी कपडे वारंवार भिजणे आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे ते लवकर न सुकणे याचाही त्रास होऊ लागतो. पावसाळ्यात आपले कपडे अनेक वेळा घाण होत असल्याने, ते धुण्याचा भारही वाढतो. शहरी, निमशहरी भागात लोक आज कपडे धुण्यासाठी ‘वॉशिंग मशीन’वर अवलंबून आहेत. वॉशिंग मशीन वर्षभर, आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, पावसाळ्यात नीट चालणे हे मशीन वापरणाऱ्यांसाठी फार महत्त्वाचे ठरते.
वॉशिंग मशीनची देखभाल करण्यासाठी आणि कपडे अगदी उत्तम प्रकारे धुवून निघण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत.
डिटर्जंट पावडर योग्य प्रमाणात वापरा. तुमच्या मशीनसाठी योग्य प्रकारचा आणि योग्य प्रमाणात डिटर्जंट वापरत असल्याची खात्री करावी. यासाठी मशीनबरोबर मिळालेली माहितीपुस्तिका वाचा. उदाहरणार्थ, टॉप लोड मशीनसाठीचे खास डिटर्जंट फ्रंट लोड मशीनमध्ये वापरणे योग्य नसते. त्याचप्रमाणे, कपड्यांचा लोड किती आहे, त्यानुसार तुम्ही डिटर्जंटचे प्रमाणदेखील तपासले पाहिजे. खूप जास्त किंवा खूप कमी प्रमाणात डिटर्जंट वापरू नये. हे प्रमाण किती असावे, याची माहिती तुमच्या मशीन मॅन्युअलमध्ये समाविष्ट असते.
मशिन नीट स्वच्छ करा: डिटर्जंट किंवा जड पाण्यामुळे काहीवेळा मशीनवर पुटे चढतात, अनावश्यक थर निर्माण होतो. यामुळे कपडे धुण्याच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो आणि विशेषतः फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीनमध्ये दुर्गंधी येऊ लागते. वॉशिंग मशीनची खास क्लिनिंग पावडर वापरून डिटर्जंटचे डाग काढून टाकणे आवश्यक ठरते. मशीनमध्ये कपडे न घालता किंवा ‘टब क्लीन मोड’ वापरून मशीन अशा प्रकारे आतून स्वच्छ करता येते. ही प्रक्रिया दर महिन्याला करावी. थोडेसे पांढरे व्हिनेगर टाकून गरम पाण्याचा ‘एम्टी लोड’ लावणे हाही एक पर्याय आहे. ही ‘एम्टी लोड’ची प्रक्रिया सुरू असताना मध्येच मशीनमध्ये थोडे डिटर्जंट टाकावे आणि प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबावे. स्वच्छ टॉवेल वापरुन मशीनमधील ड्रम, दरवाजे आणि गास्केट पुसून घ्यावेत.
दुर्गंधी टाळा: आपल्या वापरलेल्या कपड्यांना काही एक वास येत असतो, तसेच कपडे मशीनच्या धुण्याच्या जागेमध्येही काही वास राहतो. म्हणून प्रत्येक वॉशनंतर वॉशिंग मशीनचे झाकण उघडे ठेवण्याचे लक्षात ठेवावे. यामुळे मशीन सुकणे, त्याच्या आतमध्ये ताजी हवा खेळती राहणे व कुबट वास निघून जाणे याला मदत होते. त्याचप्रमाणे कपडे धुवून झाल्यावर मशीनच्या दाराच्या सभोवतालची गास्केट व्यवस्थित पुसून घ्यावे. असे न केल्यास तेथे बुरशी साठू शकते.
कपडे धुण्याचे नियोजन करा: वॉशिंग मशीनचा पूर्ण क्षमतेने वापर तुम्ही करीत असाल, परंतु मशीनमध्ये कधीही क्षमतेपेक्षा जास्त कपडे धुण्यास टाकू नका. मशीन ‘ओव्हरलोड’ करू नका. यातून तुमचे मशीन शक्य तितक्या कमी प्रमाणात ऊर्जा वापरू शकेल. तुम्हाला फक्त काही थोडकेच कपडे धुवायचे असतील, तर मशीनचा ‘इको-मोड’ (निवडक वॉशिंग मशीनमध्ये उपलब्ध असणारी सुविधा) वापरू शकता. या सुविधेमुळे वीज आणि पाणी यांची बचत होते.
जंतूनाशक पर्याय: बेडशीट, खूप घाण झालेले कपडे, घराबाहेर वापरलेले व पावसाच्या पाण्याने, चिखलाने बरबटलेले कपडे धुताना वॉशिंग मशीनमधील जंतूनाशक हा पर्याय वापरा. याचे सेटिंग वॉशिंग मशीनमध्ये उपलब्ध असते. यामध्ये मशीनमधील अंगभूत हीटर वापरला जातो आणि तुम्हाला तुमचे कपडे गरम पाण्यात धुता येतात. बहुतांश फ्रंट-लोड वॉशिंग मशीनमध्ये हे अंगभूत वॉटर हीटर बसवलेले असते. तसेच काही निवडक टॉप-लोड वॉशिंग मशीन आणि सेमी-ऑटोमॅटिक मॉडेल्समध्ये ही सुविधा देण्यात आलेली आहे. सध्याच्या विशेष काळजी घेण्याच्या काळात ही सुविधा अतिशय उपयुक्त आहे.
लिंट कलेक्टर साफ करा: वॉशिंग मशीनमध्ये अनेक वेळा कपडे धुवून झाल्यानंतर मशीनमधील ‘लिंट कलेक्टर’ भरून जाते (हा भाग बहुतांश मशीन्सच्या मध्यभागी आढळतो). आठवड्यातून किमान एकदा नळाच्या पाण्याखाली धुवून हा कलेक्टर स्वच्छ करा. हा कलेक्टर ‘लिंट’चे कण कार्यक्षमतेने गोळा करत राहील, याची काळजी घ्या.
मशीनमधील कंट्रोल्सबाबत सावधगिरी बाळगावी: काही मशीन्समध्ये ओलावा प्रतिरोधक नियंत्रण असते; परंतु काही मशीन्समध्ये ही सोय नसते. म्हणून ओले कपडे नेहमी मशीनच्या कंट्रोल पॅनलपासून दूर ठेवावेत.
मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणे: घरातील सर्व उपकरणांसाठी योग्य प्रकारचे अर्थिंग असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही उपकरणे सुरक्षित राहतात. घरात एखादे उपकरण बसवून घेण्यापूर्वी इलेक्ट्रिशियनकडून अर्थिंगची स्थिती आपण तपासून घेतली पाहिजे. अनेकदा असे दिसून येते की ग्राहक आपले वॉशिंग मशीन उघड्यावर चुकीच्या जागी ठेवतात. बहुसंख्य मशीन्सच्या तळाशी उंदीर-विरोधक जाळ्या बसवलेल्या असतात. मशीन सुरक्षित ठिकाणी, उंदरांपासून दूर ठेवण्याची शिफारस केली जाते, कारण उंदीर तुटलेल्या तारांकडे सहजपणे आकर्षित होतात आणि त्यामुळे सुरक्षाविषयक गंभीर समस्या निर्माण होतात.
अधिकृत सर्व्हिस सेंटरकडून नियमित सर्व्हिसिंग: अधिकृत सर्व्हिस सेंटरशी संबंधित असलेल्या तंत्रज्ञांकडून वॉशिंग मशीनची वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घेणे आवश्यक असते. मशीनमधील विविध भाग आणि घटक यांची स्वच्छता व देखभाल या गोष्टी आपण ग्राहक म्हणून करू शकत नसतो. त्यामुळे अशी देखभाल गरजेची आहे. मशीनमधील एखादा भाग झिजू लागल्यास त्याबाबत हा तंत्रज्ञ आपल्याला वेळीच खबरदार करील आणि त्याची दुरुस्तीही वेळेवर करेल. त्यातून मशीनमधील मोठा बिघाड टाळता येतो.

























































