पावसाअभावी पाणीप्रश्न गंभीर, ५१ टँकरनी पाणीपुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

पावसाने दडी मारल्याने नाशिक जिह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम आहे. येवला, सिन्नर, सटाणा, मालेगाव, देवळा या पाच तालुक्यांतील ६७ गावे व ८६ वाडय़ांना सध्या ५१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

जुलै महिन्याचे दोन आठवडे उलटल्यानंतरही जिह्याच्या बहुतांश भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. मागील वर्षीसुद्धा पाऊस उशिराने दाखल झाला होता. मात्र, यंदाची परिस्थिती त्या तुलनेत कठीण आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी हे जास्त पर्जन्यवृष्टीचे तालुके वगळता जिह्यात इतरत्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे उन्हाळ्याप्रमाणेच पावसाळ्यातही अनेक गावे व वाडय़ांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

जिह्यात आज १२ जुलै रोजी ५१ टँकरनी पाणी पुरविण्यात येत आहे. त्यात सर्वाधिक १८ टँकरनी येवला तालुक्यातील ३२ गावे व १९ वाडय़ांना पाणीपुरवठा होत आहे. त्यापाठोपाठ सिन्नरमध्ये पाणीटंचाईची झळ जाणवत आहे, येथे ११ गावे व ३४ वाडय़ांसाठी ११ टँकर; सटाण्यातील १३ गावे, एका वाडीकरिता १० टँकर; मालेगावला ८ गावे, २६ वाडय़ांसाठी ९ टँकर, तर देवळ्यातील ३ गावे, ६ वाडय़ांसाठी ३ टँकर सुरू आहेत.

टँकरची संख्या दुप्पट

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी टँकरची संख्या दुप्पट आहे. मागील वर्षी जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ात टँकरची संख्या अवघी वीस होती, तेव्हा सिन्नर, मालेगाव, येवला, नांदगाव या तालुक्यातील ४५ गावे व २७ वाडय़ांना पाणीपुरवठा सुरू होता.