
सामना प्रतिनिधी । सटाणा
बागलाण तालुक्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे ऑक्टोबर महिन्यापासूनच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. नद्यांना पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या पाणीपुरवठा विहिरींनीदेखील तळ गाठल्याने योजना कोलमडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात पाणी कपात होऊन पाणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. बागलाणला टंचाईचे आठ महिने काढायचे आहेत. असे भीषण जलसंकट उभे ठाकले असताना दुसरीकडे दररोज टँकरच्या संख्येत होणारी वाढ, नदीकाठच्या गावांची पाण्याच्या आवर्तनासाठी होत असलेली मागणी या भयावह परिस्थितीमुळे प्रशासनाची चांगलीच कसरत होताना दिसत आहे.
बागलाण तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे ऑक्टोबरपासूनच दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. पावसाळ्यातच विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ बागलाणवासीयांवर येऊन ठेपली आहे. परतीच्या पावसासाठीदेखील होमहवन, यज्ञ करण्यात आले. मात्र वरुण राजा पावला नाही. यामुळे भीषण जलसंकट उभे असून 1972 पेक्षाही यंदा भीषण दुष्काळ असल्याचा अनुभव शेतकरी सांगत आहेत. रब्बी कांद्याचे बियाणे टाकले, रोप लावले आणि विहिरीचे पाणी आटल्याने शेकडो एकर कांद्याचे पीक सोडून देण्याची वेळ बागलाणमधील बहुतांश शेतकऱ्यांवर आली आहे. थोडीफार पुंजी जपून ठेवली तीही गेल्याने शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघाला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मक्याचा पेरा केला. एक पाऊस आला. नंतर मात्र पाऊस गायब झाल्याने पीक करपले. बाजरी, सोयाबीनचीही हीच अवस्था. जनावरांना आणि माणसांना आज हंडाभर पाणी विहिरीत साचतेय, परंतु पुढचे आठ महिने कसे जाणार, माणूस कुठूनही पाण्याची तहान भागवेल जनावरांचे काय, या विवंचनेत शेतकरी असल्याचे भीषण दुष्काळाचे वास्तव बागलाणमध्ये अनुभवायला मिळत आहे.

































































