
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया भातसा धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात पाणी घुसल्याने झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत आजपासून 15 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. या बिघाडाची व्याप्ती मोठी असल्याने 2 ते 4 दिवसांनंतरच पाणीपुरवठा सुरळीत होण्याबाबत निश्चित माहिती मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भातसा धरणात वीजनिर्मिती केंद्र असून या ठिकाणी 15 मेगाव्हॅट वीजनिर्मितीदेखील केली जाते. मात्र या वीजनिर्मिती केंद्रात रविवारी पाणी शिरल्याचा प्रकार घडला.
पर्यायी व्यवस्थेचीही चाचपणी
पॉवर हाऊसमध्ये पाणी शिरल्याने मोठय़ा दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. एक-दोन दिवसांत याबाबतची स्थिती समजू शकेल. त्यामुळे दुसरे गेट ओपन करून पर्यायी व्यवस्था निर्माण करता येते का याबाबतही चाचपणी सुरू आहे. मात्र तोपर्यंत कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पाण्याची लेव्हल मेंटेन करून 15 टक्के पाणीकपात करून पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे.



























































