राज्यात पाणी महागले! ग्रामपंचायती, पालिकांच्या पाणीदरात वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्र विधिमंडळाने नेमलेल्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ग्रामपंचायतींपासून ते महापालिकांपर्यंतच्या पाणीपट्टीचे नवीन दर निश्चित केले आहेत. यानुसार 2010 नंतर सात वर्षांनी पाणीदरामध्ये वाढ करण्यात आली आहे. यानुसार हजार लिटरमागे ग्रामपंचायतींना 13.2 पैशांवरून 15 पैसे, नगरपालिकांसाठी 15.8 पैशांवरून 18 पैसे, महापालिकांसाठी 21 पैशांवरून 25 पैसे तर टाऊनशिपसाठी 21 पैशांवरून 1.25 रुपये इतकी दरवाढ करण्यात आली आहे. मिनरल वॉटर, शीतपेये, बीअर उत्पादक उद्योगांसाठी सर्वाधिक 16 रुपयांवरून 120 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पाण्याचे नवीन दर ठरविले असून या दरांना आज झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी तसेच सदस्य विजय कुलकर्णी यांनी ठरविण्यात आलेल्या नवीन दरांविषयीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका यांच्या पाणीवापरावर नियंत्रण आणण्यासाठी पाणीदर निश्चित करण्यात आले आहेत. यानुसार या सर्व सार्वजनिक संस्थांना पाण्याचे ऑडिट करावे लागणार आहे. यासाठी संभाजीनगर येथे ऑडिटरचे कार्यालय ठेवण्यात आले असून या ऑडिटरसमोर पाण्याचे ऑडिट सादर करावे लागणार आहे.

ग्रामपंचायतींना मिळणार अतिरिक्त पाणी
पाणीवाटप धोरणानुसार ग्रामपंचायतींना आतापर्यंत दरडोई 40 लिटर इतके पाणी दिले जात होते. नवीन धोरणानुसार दरडोई पाण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून ग्रामपंचायतींना दरडोई 55 लिटर पाणी मिळणार आहे. ‘क’ वर्ग नगरपालिकांसाठी हे प्रमाण दरडोई 70 लिटर, ‘ब’ वर्ग नगरपालिकांसाठी दरडोई 100 लिटर, ‘अ’ वर्ग नगरपालिकांसाठी दरडोई 125 लिटर, तर मुंबई महापालिका सोडून 50 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या महापालिकांसाठी 135 लिटर तर 50 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई महापालिकेसाठी 150 लिटर दरडोई पाणी दिले जाते.
मुंबईकरांसाठी

पाणीपट्टीवाढ नगण्य
मुंबईकरांसाठीचे धरणे ही महापालिकेने स्वतः बांधली आहेत. भातसा धरणाच्या बांधकामातही महापालिकेचे योगदान असल्याने महापालिकेला केवळ 16 टक्के पाणीपट्टी द्यावी लागते. मुंबई महापालिकेसाठी ही दरवाढ 0.04 पैसे इतकी नगण्य असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना या पाणीपट्टीवाढ झाली तरी ती नगण्य असू शकते.

महापालिकांना पाणीपट्टी वाढ करणे हे ऐच्छिक
महापालिकांना नवीन पाणीपट्टीदर लागू केले असले तरी त्यांना आपल्या ग्राहकांसाठी पाणीपट्टी वाढ ऐच्छिक असणार आहे. पाणीवाटपात होणारे पाण्याचे 30 ते 40 टक्के नुकसान भरून काढल्यास महापालिकांना आपल्या ग्राहकांसाठी पाणीपट्टी वाढ करावी लागणार नाही, असे मत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नोंदवले आहे.

पाणीवाटप संस्था तयार केल्यास शेतकऱयांना 25 टक्के सवलत
शेतकऱयांसाठी पाण्याचा दर खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामांसाठी हजार लिटरला 4.50 पैसे, 9.00 पैसे व 13.50 पैसे राहणार आहे. जर शेतकऱयांनी पाणीवाटप संस्था स्थापन केली तर या दरात 25 टक्के सवलत मिळणार असून सूक्ष्म सिंचनासाठी दरात 25 टक्के प्रोत्साहनात्मक सूट मिळणार आहे. कृषी उद्योगांसाठी 25 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रक्रिया उद्योगांसाठी पाणीवाटपाचा दर 3.2 वरून 4.80 रुपये इतका करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शासकीय उपसा सिंचन योजनेवरील शेतकऱयांना पाणीपट्टी + 19 टक्के वीज बिलाचा भार सोसावा लागेल अशी दररचना करण्यात आली आहे.