साताऱ्यातील नद्यांमधील 12 ठिकाणचे पाणी नमुने ताब्यात, जलप्रदूषण रोखण्यासाठी ‘प्रदूषण नियंत्रण’ सतर्क

गणेशोत्सवाच्या धामधुमीमध्ये जलप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ सतर्क झाले आहे. साताऱयातील कृष्णा, कोयना, वेण्णा, नीरा या प्रमुख नद्यांसह एकूण 12 ठिकाणचे पाण्याचे नमुने घेतले असून, त्यांची तीन टप्प्यांत तपासणी केली जात आहे. गणेशोत्सवापूर्वी, विसर्जनाच्या पाचव्या दिवशी आणि विसर्जनानंतर असे तीन वेळा हे नमुने घेतले जातात.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नियमितपणे या पाण्याचे नमुने तपासतात. या तपासणीतून पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केले जाते आणि जलप्रदूषणाची पातळी समजून घेण्यास मदत होते. मूर्ती विसर्जनामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो. बीओडी आणि विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी तपासल्याने पाणी किती काळ टिकू शकते, याची माहिती मिळते. या माहितीच्या आधारे प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. जलप्रदूषण रोखण्यासाठी मंडळातर्फे विविध पातळ्यांवर जनजागृती केली जात आहे. यात नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावोगावी लोकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. नागरिकांना गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात, वापर नसलेल्या विहिरींमध्ये किंवा बंद असलेल्या खाणींमध्ये करण्याचे आवाहन केले जात आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विसर्जनानंतर मूर्तीवरील निर्माल्य गोळा करण्यासाठी ट्रॉलीची व्यवस्था केली जाणार आहे. हे गोळा केलेले निर्माल्य कंपोस्ट खड्डय़ांमध्ये टाकून त्यापासून खत तयार केले जाईल, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील नद्यांमधील 12 ठिकाणचे पाणी नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेण्यात आले आहे. हे पाणी नमुने एका ठिकाणावरून तीन वेळा घेण्यात आले आहेत. मंडळाच्या प्रयोगशाळेत या पाण्याची तपासणी केली जाणार आहे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते यांनी सांगितले.