
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
गेल्या दीड महिन्यापासून परतीच्या पावसाचा थेंबच काय साधा ढगसुध्दा मराठवाड्याकडे फिरकलेला नाही, त्यातच भाजून काढणारे कडाक्याचे उन, या सर्वांच्या परिणामी मराठवाड्याच्या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ तर झाली नाहीच उलट आहे त्या पाण्याने झपाट्याने तळ गाठणे सुरू केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकर्सची प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्रामीण भागात पाण्यासाठी कोस कोस धावपळ करावी लागत असून, मराठवाडा वेगाने भीषण दुष्काळाच्या वाटेवर जात आहे!
दीड महिन्यांपासून विभागावर वरुणराजाची कृपाच झालेली नाही. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण पोळा, गणेशोत्सव, महालक्ष्मीचा सण हा कोरडा गेला आहे. पाऊसच नसल्याने खरिपाची पिके करपून गेली आहेत. मराठवाडा विभागातील मोठ्या ११ प्रकल्पांबरोबरच मध्यम, लघु, गोदावरी-मांजरा नदीवरील बंधारे असे जलसंपदा विभागाचे ८६४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ही ८००१.२३ दलघमी असली तरी प्रत्यक्षात या प्रकल्पांत २६२८.०७ दलघमी म्हणजे केवळ ३२.०२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणांतील हा पाणीसाठा दिवसेंदिवस कमीकमी होत आहे.
मोठे तीन प्रकल्प कोरडे
मराठवाडा विभागात जायकवाडी प्रकल्पासह एवूâण ११ मोठे प्रकल्प आहेत. यात ‘माजलगाव’, ‘मांजरा’ आणि धाराशिव जिल्ह्यातील सिना कोळेगाव प्रकल्प कोरडे पडले आहेत. या प्रकल्पांत शून्य टक्के पाणी आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीएवढाही पाऊस झालेला नसल्याने नांदेड येथील विष्णूपुरी प्रकल्प वगळता कोणतेही प्रकल्प शंभर टक्के भरु शकलेले नाहीत. ज्या प्रकल्पांत पाणीसाठाच झाला नाही, ते कोरडे पडत आहेत. मांजरा धरणात गत आठवड्यात १ टक्का पाणीसाठा होता, आता हे धरणही शून्यावर आले असून लातूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्याच निर्माण झाला आहे. मोठ्या प्रकल्पात केवळ ३७ टक्के पाणी उपलब्ध आहे.
ह जायकवाडी ४१ टक्क्यांवर
मराठवाडा विभागातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या जायकवाडी प्रकल्पात आजमितीला ४१ टक्के पाणी उपलब्ध आहे. हे पाणी धरण क्षेत्राच्या वरती उत्तर महाराष्ट्रात झालेल्या पावसाचे आहे. या धरणावरून संभाजीनगर शहरासह जालना आणि सुमारे ३०० गावांना पाणीपुरवठा केला जातो. गत आठवड्यात या प्रकल्पात ४४ टक्के पाणी उपलब्ध होते. त्यात घट होऊन ते ४१ टक्क्यांवर येऊन पोहचले आहे. आगामी काळात पाण्याची समस्या गंभीर बनण्याची शक्यता आहे.


































































