
सामना प्रतिनिधी , सटाणा
दि. 5 (सा.वा.) – सटाणा शहरात तीन आठवडय़ांपासून पालिका प्रशासनाने नळांना पाणीपुरवठा केला नसल्याने शहरात निवडणुकीनंतर ‘पाणीबाणी’ सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त झालेल्या प्रशासन व लोकप्रतिनिधींनीना निवडणुकीनंतर शहरवासीयांनी सळो की पळो केल्याने आज नगराध्यक्षांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी नाशिक यांच्या भेटीसाठी रवाना होऊन केळझर धरणातील अखेरचे आवर्तन सोडण्यासाठी विनंती करणार आहेत.
आगामी आठवडयात अक्षय्य तृतीया तसेच रमजान ईद या सणासुदीच्या काळात शहरात मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच गेल्या तीन आठवडय़ांपासून शहरातील पाणीटंचाईवर मात करता येणे शक्य व्हावे यासाठी पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली गतिमान केलेल्या आहेत.
पिण्यासोबतच दैनंदिन वापरासाठीदेखील पाणी उपलब्ध नसल्याने शहरात पाण्याचे टँकर्स अवाच्या सवा दराने विकली जात आहेत. खासगी पाण्याचे टँकर्स शहरात पाणी वितरित करीत असताना मात्र पालिका प्रशासनाला टँकर्ससाठी पाणी उपलब्ध करता येत नाही हीदेखील मोठी शोकांतिका असल्याची भावना शहरवासीयांमधये व्यक्त होऊ लागली आहे.
या कारणामुळे आज नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष महेश देवरे, तसेच सर्वपक्षीय नगरसेवक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना भेटून तालुक्यातील केळझर धरणातील पाण्याचे आवर्तन सोडण्याची आग्रही भूमिका घेणार आहेत. यामुळे शहरातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.






























































