WC 2023 – दुखापतीमुळे हार्दिक पंडय़ाला आठवडय़ाची विश्रांती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशचा पराभव करून विश्वचषक स्पर्धेमध्ये हिंदुस्थानने चौथ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात हिंदुस्थानचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला दुखापत झाली असून त्याला आठवडय़ाची विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता तो धर्मशाळा येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया सामन्याला मुकणार आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विट करत हार्दिकच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे.

पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर काल बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला गोलंदाजी सोडून मैदानाबाहेर जावे लागले होते. त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्येही नेण्यात आले आणि तेथे त्याचे स्पॅनिंगही करण्यात आले. त्याच्या पायाला कोणताही प्रॅक्चर नसला तरी त्याला आठवडाभर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. तो पाचव्या सामन्यासाठी संघासोबत धर्मशाळेला गेलेला नाही. तो थेट 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध होणाऱया सामन्यासाठी लखनौ गाठेल.

हार्दिकच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्ध सूर्यकुमार यादव किंवा ईशान किशनला संघात स्थान मिळू शकते. तसेच  अद्याप एकही संधी न लाभलेल्या मोहम्मद शमीलाही आजमावले जाऊ शकते.

फटके आणि फटाके – …चारधाम यात्रा परवडली असती