फटके आणि फटाके – …चारधाम यात्रा परवडली असती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

बृहस्पतीवारी पुण्याला वर्ल्ड कप मॅच कव्हर करायला जाणं हा एका डोळय़ात अश्रू आणि राग आणि दुसऱया डोळय़ात आनंद आणि कौतुक होतं.

पहिली वेळ सकाळची, दुसरी रात्रीची.

एक गोष्ट मला कबूल केली पाहिजे की, सामान्य जनतेच्या तुलनेत पत्रकाराची व्यवस्था खूप चांगली होती. अपवाद प्रेस बॉक्स आणि शौचालय. सहाशे कोटींपेक्षा अधिक कोटींचे स्टेडियम बांधल्यावर यापेक्षा अधिक चांगल्या प्रेसबॉक्सची अपेक्षा होती. शौचालय असं होतं की, पेशंटला दोन फेऱ्या त्यातून मारल्यानंतर वेगळा अॅनेस्थेशिया द्यायची गरज नव्हती. पत्रकार जे त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या गाडीतून पुण्याहून निघून मैदानावर आले, त्यांचे हाल झाले नाहीत. पण ते बहुधा अकरापर्यंत मैदानावर सुखात पोहोचले. काही स्मार्ट पत्रकारांनी गाडीचे पार्किंग पास मिळवले आणि स्वतःच्या गाडीतून प्रेसबॉक्सपर्यंत सुखरुप पोहोचले. माझ्यासारखे मूर्ख जे सकाळी मुंबईहून निघाले आणि मॅच कव्हर करायला गेले ते फसले. मला जितका वेळ मुंबईहून गहुंजेला पोचायला लागला तितकाच वेळ मुख्य रस्त्यावरून स्टेडियममध्ये जायला लागला. म्हणजे, किमान दोन तास. एक्सप्रेस वेवरून जाताना ते मैदान एखाद्या माळरानावर उगवलेल्या सुंदर फुलासारखं दिसतं; पण इतक्या वर्षांत माळरान माळरानच का राहावं? स्वतःची गाडी सोडून मैदानावर पोहोचतात कसं, या माझ्या प्रश्नाचं कुणी उत्तर देऊ शकलं नाही. तिथे बसने यायची सोय मला तरी दिसली नाही. स्वतःला मॅच पाहायला जायचं असल्याशिवाय किंवा डोकं फिरल्याशिवाय रिक्षावाला, टॅक्सीवाला गाडी पेशव्यांच्या काळातल्या रस्त्यावर घालणारच नाही. आणि चालत जायचं असेल तर दीड दोन किलोमीटर दुपारी एकच्या चांदण्यात चालावं लागतं. तिथं चालताना मायक्रोवेव्हमधल्या गरम होणाऱया चहाच्या भावना काय असतील ते कळतं. त्या दिवशी माझ्यासारखी हजारो माणसं त्या मायक्रोवेव्हमधून चालली होती. मी नशीबवान. माझा एक तरुण पत्रकार मित्र माझ्याबरोबरच होता. त्याने बिचाऱयाने माझी बॅग हातात घेतली. दुसरा मित्र प्रेसबॉक्समधून गाडी काढून मला शोधत आला. चारधाम यात्रा कदाचित कमी कष्टात पुरी करता येत असेल, पण ही यात्रा नकोशी वाटली.

आम्ही पत्रकार तसे नशीबवान. पाऊण तासाच्या वॉकनंतर एसी प्रेसबॉक्सच्या खोक्यात विसावलो. आमच्याबरोबर चालणारे क्रिकेटचे वारकरी दोन-अडीच तासांनी स्टेडियममध्ये शिरले असतील आणि छप्पर नसलेल्या स्टँडमध्ये विसावले असतील. आपण ऑलिम्पिक भरवण्याची स्वप्नं पाहतो आणि दहा वर्षांत एका स्टेडियममध्ये जाणं सुसह्य आपल्याला करता येत नाही. मेट्रो सिटीच्या गप्पा मारतो अणि साध्या सुविधा स्टेडियमजवळ पुरवता येत नाहीत. राग आला आणि वाईटही वाटलं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये खांदेपालट झाला आहे. त्यांनी स्टेडियमच्या सुविधा आणि आयोजनासारख्या गोष्टी गंभीरपणे घ्याव्यात. नाहीतर माझ्या पुण्यातल्या मित्राप्रमाणे घरात बसून मॅच पाहणं उत्तम असं अनेकांना वाटेल. तो महाराष्ट्राचा माजी कर्णधार असून त्याला असं वाटत असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल?

पत्रकार कक्ष, तिथले पोलीस, तिथले कार्यकर्ते यांनी माझ्या वयाकडे पाहत खूप काळजी घेतली. जाताना दूरदेशी पार्क केलेल्या गाडीपाशी सोडलं. इतरांचं काय झालं देव जाणे. पण हिंदुस्थानचा विजय आणि कोहलीच्या त्या गणिती शतकाने त्यांना दिवसभराचे कष्ट विसरायला लावले असावेत.