
जगविख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्क येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ला प्रकरणावर इराणने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात इराणचा हात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र यापूर्वी इराणच्या एका नेत्याने रश्दी यांच्याविरोधात फतवा काढला होता. इराणने 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी परदेशात अशा कारवाया केल्याचा इन्कार केला आहे. तरी अनेक सरकारी वकीलांनी अशा हल्ल्यांसाठी तेहरानला दोषी ठरवले आहे.
याबद्दल इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी म्हणाले, “अमेरिकेत सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यासाठी त्यांच्या समर्थकांशिवाय इतर कोणालाही जबाबदार धरले जावे असे आम्हाला वाटत नाही.” सलमान रश्दी (75) यांच्यवर न्यूयॉर्कमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान हादी मातर (24) या आरोपीने जीवघेणा हल्ला केला होता.
रश्दी यांच्यावर झालेला हल्ला हा सुनियोजित हल्ला आहे असे अमेरिकन अधिकार्यांचे म्हणणे आहे. रश्दी यांनी द सॅटॅनिक व्हर्सेस हे पुस्तक लिहिल्यानंतर 30 वर्षांहून अधिक काळ इस्लामिक अतिरेक्यांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहोल्ला खामेनी यांनीही त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारा फतवा काढला होता. तर एका इराणी फाउंडेशनने रश्दी यांच्यावर 3 लाख डॉलरहून अधिक बक्षीस जाहीर केले आहे. कनानाईट म्हणाले की इराणकडे “अमेरिकन मीडियामध्ये जे काही दाखविले जात आहे त्याशिवाय इतर कोणतीही माहिती नाही.”




























































