
सामना ऑनलाईन, कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये जिंकण्याची क्षमता असलेले भाजपकडे फारसे उमेदवार नाहीत अशी स्पष्ट कबुली तिथल्या भाजपध्यक्षांनी दिली आहे. आमच्याकडे चांगले नेते आहेत , मनापासून काम करणारे कार्यकर्ते आहेत मात्र जिंकण्याची क्षमता असलेले फारसे उमेदवार नाही असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. यामुळे भाजपमधील निष्ठावंत नाराज झाले आहेत. मात्र पक्षात अशी काही नाराजी नसल्याचं घोष यांचं म्हणणं आहे. जर कोणी आमच्या पक्षात येत असेल आणि आमच्या विकास, प्रगतीमुळे प्रभावित होत असतील तर त्यांना आम्ही कसं थांबवणार असा प्रश्न घोष यांनी विचारला आहे. भटपारा तदारसंघाचे तृणमूल काँग्रेसचे आमदार अर्जुन सिंह यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याप्रमाणे काँग्रे, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाच्या अन्य काही लोकप्रतिनिधींनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधून 42 पैकी 23 लोकसभेच्या जागा जिंकण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. असं असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमच्याकडे जिंकण्याची क्षमता असलेले फारसे उमेदवार नाही हे विधान अमित शहांची गणितं बिघडवणारं ठरू शकतं.
























































