7 वर्षांत 3 कोटी गरीबांना आम्ही लखपती बनविले!

आम्ही गरीबांना लखपती आणि महिलांना मालकीण केलं असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या घरांमुळे गरीब लखपती झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. जी लोकं झोपडपट्ट्यांमध्ये राहायची ती आता पक्क्या घरात राहू लागली आहेत. भाजप सरकारने या घरांसाठीची किंमती आणि आकार दोन्ही वाढवल्या असल्याने त्याचा लाभ या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना होत असल्याचं पंतप्रधानांचे म्हणणे आहे. यातील बहुतांश घरांची मालकी ही महिलांकडे असल्याने आम्ही महिलांना खऱ्या अर्थाने मालकीण बनवल्याचंही पंतप्रधानांचे म्हणणे आहे.

पंतप्रधानांनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची उजळणी करण्याचा प्रयत्न केला. 7-8 वर्षांपूर्वी देशाचा जीडीपी 1,10,000 कोटी रुपये इतका होता, आज मात्र हा आकडा 2,30,000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला असल्याचं मोदींनी म्हटलंय. कोरोना महामारीनंतर एक नवी वैश्विक व्यवस्था निर्माण होण्याची शक्यता असून, हिंदुस्थानकडे पाहण्याचा इतर देशांचा दृष्टीकोण बदलल्याचंही त्यांनी म्हटलंय. गेल्या 7 वर्षांत आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी टाकण्यात आलेल्या पावलांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होत चालल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे.