आम्ही शांतीचे पुरस्कर्ते, पण छेडाल तर घरात घुसून मारू; अमित शहांचा पाकिस्तानला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amit-shah

हिंदुस्थानने जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान युद्धाची भाषा बोलत आहे. पंतप्रधान इम्रान खानपासून त्यांच्या मंत्र्यांनाही युद्धाची खुमखुमी सुटली आहे. युद्धाची भाषा बोलणाऱ्या पाकिस्तानला गृहमंत्री अमित शहा यांनी कडक शब्दात इशारा दिला. आम्ही शांतीचे पुरस्कर्ते आहोत, परंतु आम्हाला छेडाल तर घरात घुसून मारण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानला ‘एअर स्ट्राईक’ची आठवण करून दिली. गांधीनगरमधील पंडित दीन दयाल उपाध्याय पेट्रोलियम विश्वविद्यालयात ते बोलत होते.

उरी हल्ल्यानंतर आम्ही पाकिस्तानविरोधात ‘एअर स्ट्राईक’ केला. आम्ही शांतीचे पुरस्कर्ते आहोत, परंतु आम्हाला छेडाल तर घरात घुसून मारण्यासही मागेपुढे पाहणार नाही हे आम्ही जगाला दाखवून दिल्याचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. पुलवामा हल्ल्यानंतरही आम्ही पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये घुसून कारवाई केली आणि सीमारेषांवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्यांना आणि हिंसाचार करणाऱ्यांना चाप घातल्याचे शहा म्हणाले. तसेच देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, हे देखील ते ठासून म्हणाले.