‘आम्ही जम्मू आणि कश्मीरमध्येच चांगले होतो’, सोनम वांगचुक यांची लडाखच्या भवितव्यासाठी लढाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Sonam-Wangchuk-ladakh

थ्री इडियट चित्रपटानंतर जगभरात प्रसिद्धीस आलेले लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक म्हणतात की, ‘लडाख कायमस्वरूपी राज्यपालांच्या राजवटीत राहू शकत नाही’. लडाखच्या केंद्रशासित प्रदेशाच्या दर्जात आपल्याला अत्यंत असुरक्षित वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

वांगचुक, यांनी मंगळवारी त्यांचं पाच दिवसांचं उपोषण संपवलं, ते संविधानाच्या 6 व्या अनुसूची अंतर्गत लडाखला राज्याचा दर्जा आणि विशेष दर्जाच्या मागणीसाठी लढत आहेत.

‘आता संरक्षणासारखे कोणतेही कलम 370 नाही. म्हणून आम्ही लडाखसाठी कलम 244 च्या 6 व्या अनुसूची अंतर्गत संरक्षण असावे अशी मागणी करतो’, असं वांगचुक म्हणाले.

एनडीटीव्हीनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वांगचुक म्हणाले की, ‘5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलं होतं. मात्र लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवल्याचा गंभीर परिणाम आता दिसू लागला. केंद्रशासित प्रदेश बनण्याचे तोटे कळायला आम्हाला वेळ लागला.’

भाजप सरकारने जम्मू आणि कश्मीरचा राज्याचा कलम 370 अंतर्गत विशेष दर्जा काढून घेतल्यावर आणि लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केल्यानंतर वांगचुक यांनी पंतप्रधानांचे आभार मानले होते.

आता वांगचुक म्हणतात की, ‘सध्याची लडाखची परिस्थिती लक्षात घेता, लडाख हा प्रदेश पूर्वीच्या जम्मू आणि कश्मीर राज्याचा भाग होता तेच अधिक चांगले होते हे कबूल करण्याची वेळ आली आहे’.

‘लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी वेळ लागला. या प्रदेशासाठी कोणतेही सुरक्षेचे उपाय नाहीत त्यामुळे मला आता अत्यंत असुरक्षित वाटत आहे, असं वांगचुक म्हणाले.

लडाखच्या नेत्यांचं म्हणणं आहे की लडाखसाठी फक्त सहावे शेड्यूल आणि राज्याचा दर्जा लोकांमधील वाढत्या परकेपणाला तोंड देईल. वांगचुक यांनी मंगळवारी त्यांचे पाच दिवसांचे उपोषण संपवले तेव्हा लेहमधील पोलो मैदानावर हजारो लोक त्यांच्या समर्थनार्थ जमले होते आणि त्यांनी राज्याचा दर्जा आणि 6 व्या शेड्युलचा निषेध केला.

2019 मध्ये केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा साजरा करण्यापासून आता लडाख थेट केंद्र शासनाच्या विरोधात गेल्याचं दिसत आहे. वांगचुक म्हणाले की, ‘स्थानिकांना कारभार करण्यास अडचणींचा सामना करावा लागत असताना, या प्रदेशाची संस्कृती, पर्यावरणाला धोका निर्माण झाला असताना गप्प बसता येणार नाही’.

‘मला असं कधीच म्हणायचं नव्हतं, परंतु आता असं म्हणावं लागत आहे की आम्ही जम्मू आणि कश्मीरमध्येच चांगले होतो’, असं वांगचुक यांनी सांगितलं.

भाजपचं म्हणणं आहे की, ‘लडाखच्या नेत्यांचा असं बोलणं म्हणजे विरोधाभास आहे, जे यापूर्वी केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी करत होते. राज्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक उच्च-सक्षम समिती स्थापन केली असून त्यांच्या मागण्यांमधील हा विरोधाभास संपेल’, असं भाजप प्रवक्ते आरएस पठानिया म्हणाले.