वेब न्यूज – टाईम ट्रॅव्हल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

आज तंत्रज्ञान अत्यंत प्रगत होत आहे, वेगाने बदलतदेखील आहे. भूतकाळात ज्या गोष्टींची कल्पना केली होती अथवा कादंबऱया, चित्रपटांतून ज्यांची वर्णने केली गेली होती अशा गोष्टी, तंत्रज्ञान आता प्रत्यक्षात उतरले आहे आणि काही भविष्यात साध्य होणार आहे. मोबाईल, सॅटेलाईट, सुपरसॉनिक विमान, हायपरलूप ट्रेन, ड्रोन्स अशा तंत्रज्ञानाने मानवाला थक्क केले आहे. त्यातच आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI ची भर पडली आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात आता चर्चा सुरू झाली आहे ती टाईम ट्रव्हलची. टाईम मशीन बनवण्यात आणि त्याच्या मदतीने भूतकाळात किंवा भविष्यकाळात प्रवास करणे मानवाला शक्य होईल का? हा खरा प्रश्न आहे.

टाईम ट्रव्हल म्हणजे नक्की काय याचे स्पष्टीकरण एका संशोधकाने खूप छान दिले आहे. बंदुकीतून सुटलेली गोळी जर बघायची असेल, तर तिच्यापेक्षा जास्त वेगाने धावत पुढे जाऊन मागे वळून पाहावे लागेल, तेव्हा ती दिसेल. त्याचप्रमाणे टाईम ट्रव्हलची व्याख्या करता येईल. आपल्या आजूबाजूला घडणारी प्रत्येक घटना ही ब्रह्मांडामध्ये दृश्य आणि आवाजाच्या स्वरूपात साठवली जात असते असे संशोधक मानतात. ज्याप्रमाणे आपण एखादा चित्रपट पाहतो, त्याप्रमाणे टाईम मशीनच्या मदतीने आपण ही घटना पुन्हा अनुभवू शकतो. इतकेच नाही, तर जी घटना भविष्यात घडणार आहे तीदेखील आपण बघू शकतो.

पण आपण या घटनांमध्ये काही बदल करू शकतो का? तर संशोधक सांगतात की, भविष्यातील एखाद्या भीषण प्रसंगात बदल करून आजचे वर्तमान सुरक्षित करणे शक्य आहे. मात्र आपण भूतकाळातील घटनांमध्ये मात्र बदल करू शकणार नाही. असे करण्याचा प्रयत्न केल्यास ती घटना, तिची दृश्ये आणि आवाज धूसर होत जाईल. मात्र हे तंत्रज्ञान मानवाला मिळाल्यास मानव भविष्य तर बदलू शकेलच, पण अनेक देशांचा इतिहासदेखील पुन्हा लिहिला जाईल हे नक्की. भूत आणि भविष्याची दोरी मानवाकडे आल्यास नवसृष्टीचे निर्माणदेखील साधता येईल.