वेब न्यूज – हॅकर्सची नजर स्मार्ट बल्बवर

1886
Exploding light bulb

>>  स्पायडरमॅन

सध्या ‘स्मार्ट’चा जमाना आहे. स्मार्ट फोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वॉच आणि लोक आता घरी अगदी सर्रास ‘स्मार्ट बल्ब’देखील वापरू लागले आहेत. आवाजी सूचनांचे पालन करणारा, बाहेरच्या प्रकाशानुसार, अंधारानुसार प्रकाश स्वतः ऍडजेस्ट करणारा असा हा आधुनिक स्मार्ट बल्ब चांगलाच लोकप्रिय झाला आहे. पण तंत्रज्ञान म्हणते की जसे उपयोग आले, तसेच जोडीने दुरुपयोगही आलेच. तर आता या अशा भोळ्या भाबडय़ा स्मार्ट बल्बवर हॅकर्सची नजर गेलेली आहे. या बल्बला हॅक करून हॅकर्स तुमचे खासगी संभाषण सहजपणे ऐकू शकतात असे समोर आले आहे. इस्रायलमधील नेगेव आणि वेझ्मन इंस्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या बेन-गुरियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, जर एखादी व्यक्ती पारंपरिक बल्बजवळ बोलत असेल तर 25 मीटर अंतरावर बसलेला तिसरा माणूस त्याचे बोलणे सहज ऐकू शकतो. या पद्धतीच्या तंत्रज्ञानाला शास्त्रज्ञांनी ‘लॅम्फोन’ असे नाव दिले आहे. या तंत्रज्ञानामध्ये बल्बच्या प्रकाशाची जी फ्रिक्वेन्सी असते, तिला डीकोड करण्यात येते. स्मार्ट उपकरणांचा वापर करणारे हॅकर्स, आता बल्बच्या मदतीने संभाषण टॅप करू शकत आहेत. या संशोधनानुसार ‘लॅम्फोन’ आवाजाला इलेक्ट्रो ऑप्टिकल सेंसरच्या मदतीने पकडतो, या सेन्सर्सला सरळ सरळ बल्बच्या दिशेने केंद्रित केलेले असते. यासाठी व्हॉईस टू टेक्स्ट म्हणून काम करू शकणाऱया टेलिस्कोपची देखील मदत घेतली जाते. बल्बच्या मदतीने लोकांच्या आवाजाची पातळी एका शक्तिशाली मायक्रोस्कोपच्या मदतीने वाढवतादेखील येते. इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेंसर्स बल्बच्या पृष्ठभागावर होणाऱया कंपनांवरती लक्ष ठेवून त्यांचे विश्लेषण करण्याचे कार्य करतो आणि मग त्यानंतर ऑप्टिकल सिग्नल्सच्या मदतीने ऑडिओ सिग्नलला एका अल्गोरिदमच्या मदतीने वेगळे केले जाते. मिळालेल्या सिग्नल्सला पुन्हा व्हॉईस टू टेक्स्ट ऑप्लिकेशनच्या मदतीने हॅकिंगला अंतिम स्वरूप देण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या