वेब न्यूज – ऑनलाइन गेम्स म्हणजे मुलांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक ड्रग्ज’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> >> स्पायडरमॅन

हिंदुस्थानात ’ऑनलाइन गेम्स’ वेगाने प्रसिद्ध पावत आहेत. लाखो लहान मुले, तरुण सतत मोबाईलच्या क्रीनला चिकटून हे खेळ खेळण्यात मग्न असतात. देशातीलच नव्हे, तर जगभरातील अनेक सायबर तज्ञ, डॉक्टर्स, समुपदेशक या ऑनलाइन गेम्स लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे वारंवार सांगत आहेत. सतत हे गेम्स खेळत राहिल्याने मुलांची दृष्टी तर अधू होत आहेच, पण या गेम्समधील हिंसा, अश्लील दृश्ये यामुळे लहानग्यांच्या बालमनावरदेखील विपरीत परिणाम होत आहेत. मुले एकलकोंडी, अधिक हिंसक आणि गैरवर्तन करणारी बनत चालली आहेत. हिंदुस्थानातदेखील या विषयावर अनेकदा चर्चा झडत असतात, काही विचित्र घटना समोर येत असतात, पण ठाम असा कोणताही निर्णय या खेळांविरुद्ध घेतला जात नाही. मात्र चीनच्या सरकारने आता आपली कठोर नजर अशा ‘ऑनलाइन गेम्स’कडे वळवली आहे. चीनच्या अधिकृत सरकारी वृत्तपत्राने नुकतीच आपल्या एका लेखात अशा गेम्सवर जळजळीत टीका केली असून अशा गेम्सना ‘मुलांच्या मनासाठी अफीम’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक ड्रग्ज’ अशा उपमा दिल्या आहेत. मुलांना या गेम्सचे अमली पदार्थाप्रमाणे व्यसन लागू लागले असल्याची काळजीदेखील या लेखात व्यक्त करण्यात आली आहे. या लेखाला चीन सरकारचे ‘गेम इंडस्ट्री’साठी लवकरच कडक निर्बंध येणार असल्याचा संकेत मानले जात आहेत. यापूर्वी 2018 मध्येदेखील चीन सरकारने मुलांची दृष्टी सतत गेम्स खेळून अधू होऊ नये यासाठी काही कडक नियम राबविले होते. त्यावेळी यापुढे बाजारात कोणताही नवा गेम दाखल करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते, तर 2019 मध्ये 18 वर्षांखालील मुलांना रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत गेम्स खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. चीन सरकारने दिलेल्या या संकेतानंतर हाँगकाँगच्या शेअर मार्केटमध्येदेखील खळबळ उडाली असून आघाडीवर असलेल्या अनेक गेम उत्पादक कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळले आहेत. यामध्ये टेसेंट, नेटईज, आर्कसौर अशा मातब्बर गेम उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे.