वेब न्यूज – पृथ्वी फिरायची बंद झाली तर?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विठ्ठल जाधव

‘नील टायसन’ हे अमेरिकेचे प्रसिद्ध संशोधक आणि खगोलशास्त्रज्ञ आहेत. आपल्या सोशल मीडियावरून ते कायमच अनोखी आणि थक्क करणारी माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असतात. नुकतीच त्यांनी दिलेली एक मुलाखत सध्या इंटरनेटवर प्रचंड चर्चेत आहे. यामध्ये टायसन यांनी ‘पृथ्वी जर एक सेकंदासाठी स्वतःभोवती फिरायची थांबली तर काय होईल?’ याविषयी माहिती दिली आहे, जी आश्चर्यचकित करणारी आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि त्याच वेळी ती स्वतःभोवती देखील फिरत असते हे आपण लहानपणी शिकलो आहोत. पृथ्वीच्या या प्रदक्षिणेला 23 तास, 56 मिनिटे आणि 4.1 सेकंद इतका अवधी लागतो. पृथ्वीच्या या परिक्रमेमुळे या धरतीच्या अर्ध्या भागात रात्र आणि अर्ध्या भागात दिवस हे परिणाम घडत असतात. अशी ही पृथ्वी जर फक्त एक सेकंदासाठी फिरायची थांबली तर काय होईल? टायसन यांनी आपल्या प्रचंड अशा संशोधनानंतर यावर उत्तर दिले आहे. ते म्हणतात, ‘एक सेकंद म्हणजे काही फार वेळ नाही असा आपल्या सगळ्यांचा समज असतो. पण हे अत्यंत चूक आहे. पृथ्वी फक्त एक सेकंद जरी फिरायची थांबली, तरी प्रचंड मोठा उत्पात घडून येईल. पृथ्वीवर वातावरण ’विनाशकारी’ या एका शब्दात बदलून जाईल, कदाचित संपूर्ण मानवजात धोक्यात येईल. 800 मैल प्रतितास या वेगाने फिरणाऱया पृथ्वीचे हे फिरणे आपण धरतीवासीयांना बिलकुल जाणवत नाही, कारण आपणदेखील त्याबरोबर फिरत असतो. पृथ्वीप्रमाणेच पृथ्वीवरच्या प्रत्येक वस्तूला स्वतःची अशी एक गती असते. जर पृथ्वी फिरायची थांबली तर, पृथ्वीवरील प्रत्येक सजीव, प्रत्येक वस्तू ही पृथ्वी ज्या दिशेने फिरते त्याच्या बरोबर उलट दिशेले फेकले जातील. कोणी खिडकीतून बाहेर फेकले जाईल, तर कोणी उंच इमारतीमधून खाली ढकलले जाईल. एखाद्या मोठय़ा अपघातानंतर चारचाकी गाडीतून तिचा ड्रायव्हर ज्या प्रकारे बाहेर फेकला जातो अगदी तशी अवस्था प्रत्येकाची होईल. कदाचित पृथ्वीवरील सजीवसृष्टीच नाहीशी होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.