वेब न्यूज – कोरोनाच्या जोडीला हॅकिंगचे संकट

>>  स्पायडरमॅन

संपूर्ण जग कोरोनाच्या रोगाशी लढत आहे. जगभरातील अर्थव्यवस्था आणि उद्योगधंद्यांना उतरती कळा लागल्याची चिन्हे आहेत. या सगळ्याशी विविध देशातील सरकारे आणि जनता झुंज देत असतानाच कोरोनाच्या जोडीने हॅकर्सने देखील जगभरच नागरिकांना आणि उद्योगधंद्यांना चांगलेच आर्थिक तडाखे दिल्याचे समोर आले आहे. बॅराकुडा नेटवर्क या संस्थेने केलेल्या पाहणीचे निष्कर्ष नुकतेच खुले करण्यात आले आहेत. निव्वळ जुलै 2020 ते ऑगस्ट 2020 या महिन्यांत 3,53,381 सायबर हल्ले घडवण्यात आले आहेत. सुरक्षा संस्था म्हणून नावाजलेल्या बॅराकुडाच्या अहवालानुसार कोरोनाच्या काळात सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात 667 येवढी प्रचंड वाढ झाली आहे. केवळ 1 मार्च 2020 ते 23 मार्च 2020 या काळात 4,67,825 फिशिंग ईमेल्स पाठवण्यात आल्या, ज्यातील 9116 या कोरोनाशी संबंधित होत्या. फेब्रुवारामध्ये हेच प्रमाण 1118 तर जानेवारामध्ये 137 येवढेच होते. याचा अर्थ कोरोनाशी संबंधित फसव्या ईमेल्स पाठवण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत गेली आहे. या फसव्या ईमेल्सच्या मदतीने लोकांच्या संगणकात मालवेअर इंस्टॉल केले जात आहे आणि जोडीला त्यांची वैयक्तिक माहितीदेखील चोरली जात आहे. हिंदुस्थानचा जर विचार केला तर गेल्या आठ महिन्यांत हिंदुस्थानात 6,96,938 येवढय़ा प्रचंड प्रमाणात सायबर हल्ले झाले आहेत. यासंदर्भात खुद्द हिंदुस्थान सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने माहिती दिली आहे. त्यांच्या अहवालानुसार जानेवारी ते मार्च 2020 मध्ये देशात एकूण 1,13,334, एप्रिल ते जूनमध्ये 2,30,223 आणि जुलै आणि ऑगस्टदरम्यान 3,53,381 सायबर हल्ले झालेले आहेत. केंद्रीय शिक्षा, संचार तथा इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रौद्योगिकीच्या नुसार यावेळी गेल्या तीन वर्षांत या सायबर हल्ल्यांपासून मुक्ततेसाठी देण्यात आलेला रकमांचे तपशीलदेखील समोर आले आहेत. 2017-18मध्ये सायबर हल्ल्यांचे निवारण करण्यासाठी 86.48 कोटी रुपये देण्यात आले, ज्यातील 78.62 रुपये खर्च करण्यात आले. 2018-19 साली 141.33 करोड रुपये देण्यात आले आणि त्यापैकी 137.38 खर्च झाले. तर वर्ष 2019-20 साली 135.75 करोड रुपये सायबर फंड म्हणून देण्यात आले आणि त्यातील 122.04 करोड खर्च झाले.

आपली प्रतिक्रिया द्या