वेब न्यूज – स्मार्ट लेन्सेस

1297

सध्या ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाचा जमाना आहे. स्मार्ट फोनपासून सुरू झालेले हे युग आता स्मार्ट कपडे आणि स्मार्ट दिव्यांपर्यंत येऊन पोहचलेले आहे. वैद्यकीय क्षेत्रातदेखील या स्मार्ट तंत्रज्ञानाने चांगलीच आघाडी घेतलेली आहे. सॅराटोगा, कॅलिफोर्निया इथल्या मोजो व्हिजन (Mojo Vision) या स्टार्टअप कंपनीने ‘स्मार्ट लेन्सेस’ बनवल्याचा दावा केला आहे. या स्मार्ट लेन्सेसमध्ये Augmented Reality या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. ज्या प्रमाणे आपण मोबाईलचा क्रीन रोटेट करणे, प्रकाश रचना बदलणे, झूम करणे इ. क्रिया करू शकतो अगदी तशाच क्रिया आता आपल्याला आजूबाजूच्या प्रत्यक्ष दिसणाऱया दृश्यांवरती करणे शक्य होणार आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ऍपलसारख्या कंपन्यांनी विचारही केला नसेल अशा क्षेत्रात आपण हे यश मिळवल्याचा कंपनीला फारच आनंद झालेला आहे. आपल्या या उत्पादनाला कंपनीने ‘मोजो लेन्सेस’ असे नाव दिले आहे. अंधुक दृष्टी असलेल्या किंवा काही कारणाने थोडय़ा प्रमाणात दृष्टी गमावलेल्या लोकांसाठी हे तंत्रज्ञान वरदानच ठरणार आहे असा कंपनीचा दावा आहे. त्या जोडीलाच औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱया आणि प्रत्यक्ष फील्डवरती काम करणाऱया कामगारांना याचा खूप फायदा होणार आहे. सध्याच्या अवजड हेडसेट्सपेक्षा या ‘मोजो लेन्सेस’ वापरण्यास अधिक सुलभ आणि आजूबाजूला प्रत्यक्षात घडत असलेल्या गोष्टींना जास्ती सुस्पष्टपणे दर्शवणाऱया असतील. आजवर बनलेल्या डिस्प्लेमधील smallest आणि densest dynamic display असे याच्या डिस्प्लेचे कंपनीने वर्णन केले आहे. या मोजो लेन्सेसच्या मदतीने अग्निशमन दलातील कर्मचारी अधिक चांगल्या प्रकारे आणि वेगाने मदतकार्य करू शकतील, तसेच आगीच्या ज्वालांमागची दृश्ये अधिक प्रभावीपणे बघू शकतील असे देखील या स्टार्टअप कंपनीने नमूद केले आहे. माणसेदेखील या लेन्सेसच्या मदतीने एकमेकांशी अधिक सोप्या पद्धतीने आणि रंजकतेने संवाद साधू शकतील. ‘मोजो लेन्स’ अद्याप प्रगतिपथावर आहेत आणि बाजारात जाण्यापूर्वी तिला एफडीएची मंजुरी आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या