
>> स्पायडरमॅन
कॅलिफोर्नियाच्या सॅन जोसमध्ये असलेल्या अल्ट्रासेन्स कंपनीने जगातील कोणत्याही पृष्ठभागाला टचस्क्रीनमध्ये परिवर्तित करण्याचा चंगच बांधला आहे. या नवीन स्टार्टअप कंपनीने बनवलेल्या थ्री डी अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानावरती आधारीत ‘टचपॉइंट’ या नवीन सेन्सर तंत्रज्ञानाच्या मदतीने धातू, काच, लाकूड, प्लॅस्टिक आणि सिरॅमिकसारख्या तंत्रज्ञानास अनुकूल नसलेल्या अशा पृष्ठभागांनादेखील टचस्क्रीनमध्ये बदलण्यात यश येणार आहे. मोबाईलला हात न लावता नुसत्या बोटाच्या खाली आणि वर केलेल्या आभासी हालचालींनी त्याच्या आवाजाला नियंत्रित करणे असो किंवा टोस्टरवरती मारलेल्या दोन बोटाच्या टिचक्यांनी त्याचे टायमिंग सेट करणे असो हे प्रत्यक्षात उतरणार आहे. अल्ट्रासेन्सचा असा विश्वास आहे की त्यांचा बॉलपॉइंट पेन टीपच्या आकारापेक्षा लहान असलेला छोटा सेन्सर जगाशी संवाद साधायचे सगळे मार्गच बदलून टाकणार आहे आणि ते अधिक वेगवान आणि आकर्षक बनवणार आहे. घरातल्या उपकरणांपासून ते तुमच्या कारच्या हॅण्डलपर्यंत अनेक ठिकाणी आभासी बटणांचा उपयोग यामुळे शक्य होणार आहे. या सेन्सरमध्ये वापरण्यात आलेले 3 डी अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञान कोणत्याही पृष्ठभागावर काम करू शकते आणि त्या पृष्ठभागावर होणाऱया ध्वनिलहरींना पकडू शकते. एवढेच नाही तर विविध स्पर्शाच्या ध्वनिलहरींमधील फरकदेखील ओळखू शकते आणि त्याप्रमाणे हुकमाचे पालन करते. टचपॉइंट सेन्सरला सिस्टम-ऑन-चिप किंवा एसओसी म्हटले जाते. म्हणजेच ते त्यात तयार केलेले सर्व आवश्यक संगणन आणि इलेक्ट्रॉनिक घटकांसह एकच सर्किट सारखे कार्यरत असते. यामुळे हा 1.4 x 2.4 x 0.49 मिलिमीटरवर इतक्या लहान आकाराचा सेन्सर अत्यंत सक्षमपणे काम करतो. सिस्टमच्या आत ऑप्लिकेशन, विशिष्ट इंटिग्रेटेड सर्किट (एएसआयसी), एंबेडेड मायक्रोकंट्रोलर, सिस्टम मेमरी आणि सिलिकॉनच्या आवरणामध्ये एक अल्ट्रासॉनिक ट्रान्सडय़ूसर आहे. हे सेन्सर खूप कमी ऊर्जा वापरतात आणि अल्ट्रासेन्सच्या मते सिस्टमच्या मुख्य प्रोसेसरवर कोणताही अतिरिक्त संगणकीय ताण येऊ देत नाहीत. जरी आपण हातमोजे घातले असाल किंवा पृष्ठभाग झाकलेला असेल तरीही आपला स्पर्श हे सेन्सर पकडू शकतात.






























































