
लग्नसोहळा म्हटलं की, किती आणि कसा खर्च होतो, ते सांगण्याची गरज नाही. सध्या कोरोनाचं सावट असल्यामुळे अनेक ठिकाणी अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न होत आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. खरं वाटणार नाही, पण फक्त 135 रुपयांमध्ये हा विवाह सोहळा पार पडला आहे. वधूवर दोघेही मूकबधीर आहेत. त्यांनी लाखो रुपये खर्च न करता, जास्त पाहुणे न जमवता, साध्या पध्दतीने लग्न होऊ शवते, हे दाखवून दिले आहे.
यवतमाळमध्ये हा अनोखा लग्न सोहळा पार पडला. वधू मंगला श्रीरामजिवर ही यवतमाळच्या अकोला बाजार कामठवाडा येथील आहे. तर वर राजेश बोरकर अमरावती येथील दस्तुरनगर येथे राहतात. दोघांच्याही नातेवाईकांनी पुढाकार घेऊन लग्न जमवले. कमीत कमी नातेवाईकांची उपस्थिती या लग्नाला होती. मुलाचे आई वडील, काका, काकू आणि मुलीचे आई वडील, बहीण, भाऊ एवढेच लोक लग्नाला हजर होते.


























































