पुनरागमनानंतर सुपरमॉमची सुपर कामगिरी,वेटलिफ्टर मीराबाई चानूनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकले

हिंदुस्थानची सुपरमॉम वेटलिफ्टर अर्थात मीराबाई चानू हिने पुनरागमनानंतरही राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुपर कामगिरी करीत सुवर्णपदकावर नाव कोरले.

टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूने महिलांच्या 48 किलो गटात क्लीन अँड जर्कमध्ये 109, तर स्नॅचमध्ये 84 किलो असे एकूण 193 किलो वजन उचलून अव्वल स्थान पटकावले. 31 वर्षीय मीराबाईने गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतल्यानंतर दुखापतींशी झुंज दिली होती. या स्पर्धेत तिच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा होती आणि तिने ती पूर्ण करत सुवर्णपदक जिंकले. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी नवे वजनी गट निश्चित झाल्यानंतर मीराबाईने 49 किलोवरून 48 किलो गटात खेळण्याचा निर्णय घेतला होता. या 48 किलो वजनी गटात मीराबाईने यापूर्वी जागतिक अजिंक्यपदक आणि दोन राष्ट्रकुल पदके जिंकली आहेत. मात्र 2018नंतर ती या गटात खेळलेली नव्हती. सोमवारच्या स्पर्धेत मात्र तिने पुनरागमनातच सोनेरी यश संपादन करून चाहत्यांना मोठा दिलासा दिला.